पैठण : पैठण येथील जायकवाडी धरणात ( Jayakwadi Dam ) 98 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात होणारी पाण्याची आवक पाहता, धरणाचे 27 वक्र दरवाजे 4 फुटाणे उघडून एक लाख 13 हजार क्युसिक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले, अशी माहिती जायकवाडी धरणाचे अभियंता अशोक चव्हाण ( Jayakwadi Dam Engineer Ashok Chava ) यांनी दिली आहे.
पाणलोट क्षेत्रात जबरदस्त पाऊस : नाशिक व नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभर चांगला पाऊस झाला. जायकवाडी धरणाच्या परिक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने धरणात 99000 क्युसेक पाण्याची आवक चालु आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने जारी केलेल्या सूचनांमध्ये नदीकाठच्या 13 गावांना सतर्क राहण्याचे व खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मागच्या काही दिवसात नाशिक तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जबरदस्त पाऊस झाल्यामुळे नदी नालेद्वारे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
व्यापारी आणि नागरिकांचे अतोनात नुकसान :जायकवाडी धरणाची पाणी पातळी आज सकाळी 98.91% एवढी आहे. जायकवाडी धरणाचा महापुराचा मागचा अनुभव पाहता सन 2006 ला सगळ्यात मोठी त्रासदि पैठणच्या नागरिकांनी व नदीकाठच्या ग्रामस्थांनी सोसली होती. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नव्हती मात्र व्यापारी आणि नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते.
पाटबंधारे विभागाची नियोजन बैठक : काल झालेल्या पाटबंधारे विभागाच्या नियोजन बैठकीत ठरवण्यात आले होते की येणाऱ्या पाण्याची आवक पाहता नदीपात्रात पाणी सोडलं जाईल नदीपात्राची पाणी वाहून नेण्याची एकूण क्षमता 1 लाख 80 हजार असून आज पाहाटे एक लाख 13 हजार क्युसेक पाणी नदीपात्रातून सोडण्यात आले आहे. याबाबत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.