औरंगाबाद - येथील जयभवानी नगरमध्ये पाण्याच्या टँकरने ७ वर्षीय चिमुकलीला चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
आईस्क्रीम घेण्यासाठी दुकानात गेलेल्या ७ वर्षीय चिमुकलीला मनपाच्या पाण्याच्या टँकरने चिरडल्याची घटना आज (7 जून) औरंगाबाद शहरातील जयभवाणीनगर येथे घडली. नेहा गौतम दंडे (वय 7 वर्ष, रा. बिदर राज्य कर्नाटक) असे ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
बहीण औरंगाबादेत राहत असल्याने मृत नेहा ही आईसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत बहिणीच्या घरी जयभवानीनगर येथे आली होती. आज ती दुपारी बारा वाजेच्या सुमारास आईस्क्रीमचा कोन आणण्यासाठी किराणा दुकानात गेली होती. आईस्क्रीम घेतल्यानंतर ती घरी जात असताना पाणी पुरवठा करणाऱ्या मनपाच्या टँकरने तिला चिरडले.
या अपघातात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टँकर चालकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलीस निरीक्षक उद्धव जाधव यांनी दिली आहे.