औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सकाळी आलेल्या अहवालात 38 रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या 38 नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 546 वर पोहचली आहे. तसेच कोरोनामुळे एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 13 वर पोहचला आहे.
हेही वाचा... मालदिवमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन INS जलसवा कोची बंदरात दाखल
रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात रामनगर -19, सिल्क मिल्क कॉलनी -8, चंपा चौक -5, दत्त नगर-1, रोहिदास नगर-2, संजय नगर-1, वसुंधरा कॉलनी N7-1, एमआयटी कॉलेज बीड बायपास-1 असे रुग्ण वाढले आहेत, तर रोशन गेट परिसरात राहणाऱ्या कोरोनाबधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मागील तीन दिवसांमध्ये औरंगाबादेत कोरोनाचे 150 हुन अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. रोशनगेट परिसरात राहणाऱ्या 50 वर्षीय रुग्णाचा मृत्यू सकाळी झाला. या रुग्णाला मधुमेहाचा आजार असून किडनी विकार देखील होता. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना कृत्रिम श्वास देखील देण्यात येत होता. मात्र, सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनामुळे मृतांची संख्या 13 झाली आहे. तर, कोरोनाबधितांची संख्या 546 वर पोहचली आहे. महत्त्वाचे म्हणजे उपचार घेऊन बऱ्या झालेल्या 20 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 52 झाली आहे.