औरंगाबाद - कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे शेतातील उभे पीक हातचे गेल्याने निराश झालेल्या वाकी (ता.कन्नड) येथील ३७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सावखेडा (ता.सिल्लोड) येथे घडली आहे. सुरेश रावसाहेब जंजाळ असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
वाकी येथील सुरेश जंजाळ यांची ४५ गुंठे जमीन आहे. सुरेश हे घरातील सर्वात मोठे होते. त्यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी होती. घरची परिस्थिती हालकीची असल्याने सुरेश यांनी सावखेडा येथील मामाची पाच एकर जमीन खंडाने केली होती. सुरेश यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. तसेच यंदा त्यांनी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खाजगी कर्जदेखील काढले होते. गत पंधरा दिवसांपासून चिंचोली लिंबाजी परिसरासह सर्वत्र पावसाचा कहर सुरू आहे. अल्प शेती त्यातच खंडाने केलेल्या जमिनीतील पीक ही अतिवृष्टीमूळे हातचे गेले. गेल्यावर्षीही परतीच्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाल्याने केलेला खर्चही निघाला नव्हता. यंदाही तीच परिस्थिती ओढवल्याने ते गेल्या काही दिवसांपासून निराश होते. मंगळवारी सुरेश हे वाकी येथून सावखेडला गेले. कर्जबाजारीपणा व अतिपावसामुळे कपाशी, मका पिकांचे झालेले नुकसान असाह्य झाल्याने कर्ज फेडण्याच्या चिंतेत सुरेश जंजाळ याने सावखेडा येथे मामाच्या शेतातच रात्रीच्या सुमारास बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाकी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. करता पुरुष गेल्याने जंजाळ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने तात्काळ सुरेश जंजाळ यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा - नाकावाटे कोरोना लस देणे होणार शक्य; भारत बायोटेकचा अमेरिकेतील विद्यापीठाबरोबर करार