औरंगाबाद - जिह्यात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या विषाणूने महाराष्ट्र औद्यगिक महामंडळातील बजाज कंपनीतही शिरकाव केला. मे महिन्यात शासनाच्या परवानगीने सुरू झालेल्या या कंपनीत दीड महिन्यात जवळपास दोनशेहून अधिक रुग्ण बाधित झाले आहेत. तर पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बजाजच्या कर्मचाऱ्यांसह वाळूज एमआयडीसीमध्ये कामास येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
1980 च्या दशकात औरंगाबादच्या वाळूज परिसरात बजाज कंपनी सुरू झाली. बजाजमुळे औरंगाबाद जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतीला वेगळे महत्व प्राप्त झाले. बजाजला साहित्य पुरवणाऱ्या अनेक कंपन्या या परिसरात अस्तित्वात आल्या, आणि मोठा रोजगार या निमित्ताने उभा राहिला. मात्र, ही कंपनी आता कोरोनाचे हॉटस्पॉट होत चालल्याने चर्तेत आली आहे. कोरोनाच्या या संकटात बजाज प्रकल्पातील 250 कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना हॉटस्पॉट भागातील कर्मचारी-
बजाजमधील कामगारांना कोरोनाची लागण होण्याची काही कारण आहेत. ज्यात महत्वाचं म्हणजे बजाज समूहात कायमस्वरूपी असलेले 3200 कामगार आहेत. यांची वय आता 50 च्या पुढे आहे. कंपनीने काम चालू करताना स्थानिक कामगारांना प्राधान्य दिल्याचे सांगितले. मात्र जून महिन्यात शहरातील हॉटस्पॉट असलेल्या भागातील कामगारांना आणि कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात आले. असेंबलचे काम औरंगाबादच्या प्लांटमध्ये होत असल्याने अनेक साधनांशी कामगारांचा संपर्क येतो. परिणामी एक शिफ्ट झाली की दुसरी शिफ्ट सुरू झाल्यावर दुसरे कामगार आले की त्या साधनांशी त्यांचा संपर्क होतो. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.
कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली असली, तरी रोजंदारीवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेतली नसल्याने काही प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला, असल्याची चर्चा होत आहे. त्यात हॉटस्पॉट ठरलेल्या भागातून काही कामगार कामावर येत असल्याने कंपनीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कंपनीत काम करताना कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यात व्यवस्थापन अपयशी झाले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी देखील योग्यती खबरदारी घेतली नाही.
कंपनीकडून नियमांची पायमल्ली -
एखाद्या कंपनीत दोन रुग्ण आढळून आले तर कंपनी दोन दिवसांसाठी बंद करावी आणि त्यानंतर ती निर्जंतुकीकरण करावी, असा नियम असताना कंपनीने पन्नासहून अधिक कर्मचारी बाधित असताना देखील कंपनी बंद केली नाही. ज्यावेळी बंद केली त्यावेळी रविवारची सुट्टी गृहीत धरून काम बंद केले. त्यामुळे व्यवस्थापनाने नियम न पाळल्याने बजाजमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावल्याच दिसून आले.
कंपनीत काम करणाऱ्या आणि हॉटस्पॉट भागात राहणाऱ्या लोकांना लागण झाली, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांना कंपनीकडून अद्याप कुठलीही भरपाई देण्यात आलेली नाही. मात्र या लोकांना भरपाईसह बाधितांवर उपचार कंपनीने करावा, अशी मागणी कामगार नेत्यांनी केली आहे.