औरंगाबाद - मनपाच्या मुख्य ड्रेनेजमधील मेनहोलमध्ये गुदमरुन ३ शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर एक शेतकरी बेपत्ता झाला आहे. त्या बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची एक तुकडी शहरात दाखल झाली आहे. या तुकडीत २७ जवानांचा समावेश आहे.
ब्रिजवाडी येथील ड्रेनेजच्या मेनहोलमध्ये मोटर लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात शेतकऱ्यांचा जीव गुदमरला होता. त्यामध्ये तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून एक शेतकरी अद्याप बेपत्ता आहे. चिकलठाणा शिवारातील मसनतपूर येथील सुखना नदी पात्रातील मनपाच्या भूमिगत गटार मेनहोलमध्ये अनधिकृतपणे टाकलेल्या विद्युत पंपाची दुरुस्ती करण्यासाठी उतरलेल्या तिघा शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तर रामेश्वर तांबे हा शेतकरी बेपत्ता झाला.
घटनेला ३० तास उलटल्यानंतरही रामेश्वर याचा शोध लागला नाही. त्यामुळे अखेर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. रात्री या पथकाने काही अंशी शोधमोहीम सुरू केली, मात्र ड्रेनेज लाईनचा कुठलाच नकाशा उपलब्ध नसल्याने शोधकार्यात अनेक अडचणी यायला सुरुवात झाली. सकाळपासूनच एनडीआरएफच्या पथकाने बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचे शोधकार्य सुरू केल्याची माहिती एनडीआरएफच्या प्रमुखांनी दिली आहे.