अमरावती - युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभाचे कार्यकारी अभियंता सदानंद शेडगे यांच्या दालनात गणपतीची स्थापना करून आरती केली. गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्त करण्याची सद्बुद्धी सार्वजनिक बांधकाम विभागाला यावी यासाठी युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले.
अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ता काँक्रिटिकरणाचे काम सुरू असून एक रस्ता पूर्ण न करता दुसऱ्या रस्त्याचे काम केले जात आहे. सारेच रस्ते अर्धवट फोडले असल्याने अमरावतीकरांना गत वर्षभरापासून त्रास सहन करावा लागत आहे. आता गणपती उत्सव जवळ आला असून खराब रस्त्यांवरून गणरायाची मिरवणूक सुरक्षित जाणार की नाही, अशी शंका असून मूर्ती खंडित झाली तर कोणाला दोषी ठरवायचे, असा प्रश्न उपस्थित करून युवसेनेने वाजतगाजत गणपतीची मूर्ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात आणली.
यावेळी कार्यकारी अभियंता सदानंद शेडगे यांच्या दलनात गणपतीची प्रतिष्ठापणा करत आरतीही करण्यात आली. यानंतर गणपती उत्सव काळापर्यंत बडनेरा, राजापेठसह विविध ठिकाणच्या रस्त्यांची कामे पूर्ण व्हायला हवीत. मिरवणुकीत खराब रस्त्याचा अडथळा आला आणि मूर्ती खंडित झाली तर संबंधीत अधिकाऱ्याला गणेश मंडपात बसवून आमच्या शिवसेना स्टाईलने त्याची पूजा केली जाईल, असा इशारा युवासेनेचे राहुल माटोडे यांनी दिला.
यावेळी शैलेश चव्हाण, पावन लेंडे, कार्तिक गजभिये, मनोज करडे, अजय सिरसाट, शक्ती भले, शिवा अजबले, प्रदीप करडे, त्रिदेव देहवाल, निलेश चव्हाण आणि प्रवीण वाकेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. रस्त्यांची कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होतील असे आश्वासन कार्यकारी अभियंता शेडगे यांनी यावेळी दिले.