अमरावती : शहरातील भुयारी गटरच्या चेंबरने एका महिलेचा बळी (Sewer Chamber accident death Amravati) घेतल्याच्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. पंधरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर आज त्या महिलेची प्राणज्योत (woman death in Sewer chamber accident) मालवली. उषा तायडे (Usha Taide Sewer chamber accident) असे मृत महिलेचे नाव आहे.
या ठिकाणी झाला होता अपघात - गर्ल्स हायस्कूल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या भुयारी गटरच्या चेंबर परिसरात हा अपघात झाला. उषा तायडे (रा. पोद्दार इंग्लिश स्कूल जवळ) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. उषा तायडे ह्या पंधरा दिवसाअगोदर काही कामानिमित्त मार्केटला आल्यानंतर परत जाण्याकरिता गर्ल्स हाईस्कूल चौक मार्गाने निघाल्या. पावसाची संततधार असल्याने चेंबरजवळ तयार झालेल्या खड्ड्यात पाणी जमा झाले. मात्र तायडे यांना याचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी उसळली आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना रेडीयंट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले; मात्र उपचाराच्या १५ दिवसानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रशासनाविरोधात जनसामन्यांचा संताप - शहरात महापालिका व पीडब्ल्यूडीच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांवर चेंबर आहे. मजिप्राची योजना जुनी असल्याने हे चेंबर खुप जुने आहेत. शहरात १० हजारांपेक्षा अधिक चेंबर लावण्यात आले आहे. या चेंबरपैकी ८० टक्के चेंबर दुरुस्त करावयाचे आहेत, अधिकांश रस्ते हे महापालिकेच्या अखत्यारित येतात. शहरातील मार्केट लाईनमधील रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आलेले आहे तर काही मार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्याने रस्त्यावर लेव्हल वाढल्या. त्यामुळे भुयारी गटरचे चेंबर हे आतमध्ये दबल्या गेल्याने खड्डा तयार झाला. हे चेंबर रस्त्याच्या सोबतच वर उचलून झाकण व्यवस्थित बसविणे प्रशासनाचे काम होते. मात्र ते काम वेळेत पूर्ण करणे तर दूर वारंवार पत्रव्यवहार करुनही गटाराच्या झाकणाची दुरूस्ती केली गेली नाही.
शिवसेनेचे महापालिका आयुक्तांना निवेदन - शिवसेनेचे राहुल माटोडे व संजय शेटे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देवून हे जीवघेणे चेंबर तत्काळ बदलण्याची मागणी केली. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यातील खड़े बुजविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाचे डोळे उघडले नाही. आता तरी नवरात्रोत्सवाच्या पूर्वी रस्त्याचे खड्डे बुजविण्यात यावे, अशी कळकळीची विनंती प्रशासनाला केली. महिलेच्या मृत्यूनंतर प्रशासनाने आणखी बळी घेण्यासाठी वाट बघू नये असा सल्लासुध्दा राहुल माटोडे यांनी दिला.