अमरावती - सोमवारी अमरावतीतील कोविड रुग्णालयात एका 55 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही महिला बिच्चू टेकडी परिसरातील राहुल नगर परिसरातील रहिवासी होती. तसेच बडनेरा परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळत असून बडनेराच्या चावडी चौक परिसरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा... ब्राह्मण महासंघाने रस्त्यातच फोडले चायना मेड मोबाईल, चिनी वस्तू न वापरण्याची घेतली शपथ
अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या सोमवारी सायंकाळी 282 वर पोहोचली आहे. सोमवारी सकाळी किशोर नगर परिसरात एक 36 वर्षांची महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. तर, बिच्चू टेकडी परिसरात राहुल नगर येथील एक 50 वर्षीय कोरोनाबाधित महिला सोमवारी उपचारादारम्यान दगावली. आजवर अमरावतीत कोरोनामुळे एकूण 17 जण दगावले आहेत. तर 91 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 74 आहे.
सोमवारी कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्यानंतर राहुल नगर, चोपराशीपुरा, काँग्रेसनगर भागात खळबळ उडाली आहे. बडनेरा येथील चावडी चौक भागात राहणाऱ्या 28 वर्षीय युवकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच 6 जून रोजी बडनेरा येथील चावडी चौक भागातील एक महिला देखील कोरोनाबधित असल्याचे समोर आले. त्यामुळे बडनेरात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 2 झाली आहे.
अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.