अमरावती - हनुमान चालीसा पठाण करण्यासाठी मी आणि खासदार नवनीत राणा त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाणार होतो. मात्र, हनुमान चालीसा पटनाला तीव्र विरोध दर्शवून आम्हा दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यासह एका महिलेला 14 दिवस कारागृहात डांबण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे भगवान श्री राम यांनी त्यांना शिक्षा दिली आहे अशी प्रतिक्रिया आमदार राणा यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घोषणेनंतर शनिवारी ( 23 एप्रिल ) हायव्होलटेज ड्रामा घडला होता. 'मातोश्री'बाहेर आणि राणा दाम्पत्याच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याचवेळी राणा दाम्पत्याने केलेल्या आव्हानाच्या भाषेने वातावरण तापले होते. अखेर सायंकाळी राणा दाम्पत्याला पोलिसांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अटक ( Rana Couple Arrested ) केली होती.