अमरावती अमरावती शहरालगतच्या जंगलात वन्य प्राण्यांची (wild animals) संख्या वाढली असून, हे वन्यप्राणी अनेकदा शहरातील नागरी वसाहतींमध्ये येत असल्यामुळे (Human animal conflict)खळबळ माजते. महादेव खोरी, विद्यापीठ परिसर, राज्य राखीव पोलीस दल वसाहत या रहिवासी भागात कधी वाघ दिसतो तर कधी बिबट्या त्यामुळे नागरिकांत दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. वनविभागाने (forest department) त्वरीत लक्ष टाकण्याची मागणी केली जात आहे.
सायंकाळी सात वाजता बिबट्या नागरी वसाहतीत राज्य राखीव पोलीस दल वसाहतीलगत असणाऱ्या व्यंकटेश कॉलनी परिसरात गत आठ दिवसांपासून रोज सायंकाळी सात वाजता बिबट्याचे आगमन होत आहे. परिसरातील स्मशानभूमीच्या भिंतीवर चढून थेट कॉलनी परिसरात हा बिबट्या शिरतो आहे. या बिबट्याने व्यंकटेश कॉलनी परिसरातील राजगुरे यांच्या घरातील कुत्रा खाल्ला असून परिसरातील भटकी कुत्री आणि डुकरांनाही गत आठ दिवसात बिबट्याने भक्ष केले आहे. या परिसरातील रहिवाशांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना या भागात एक नव्हे तर तीन ते चार बिबटे एकाच वेळी आम्ही पाहिले असल्याचे सांगितले. अनेकांनी आपल्या मोबाईल फोन कॅमेरा मध्ये परिसरात फिरणारा बिबट्या टिपला देखील आहे.
वाघाचा मुक्त वावरं महादेव खोरी आणि लगतच्या मंगलधाम कॉलनी परिसरात महिनाभरापूर्वीच भर दिवसा वाघ दिसल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य नेहमीच आढळते. आता आठ दिवसांपूर्वी महादेव खोरी ते वडाळी दरम्यान एक्सप्रेस हायवेलगत बिबट्याची दोन पिल्लं आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
भीतीचे कारण नाही -वनविभाग अमरावती शहरातील जंगलालगत असणाऱ्या नागरी वसाहतीमध्ये बिबटे फिरत असले तरी नागरिकांनी भीती बाळगू नये असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वास्तवात ज्या रहिवासी भागामध्ये बिबट्या दिसतो तो संपूर्ण परिसर जंगलाला लागून असल्यामुळे या भागात सातत्याने वन्य प्राणी फिरतात. वन्य प्राण्यांच्या अधिवासात नागरी वसाहत निर्माण झाली असल्यामुळे या भागातील माणसांना नेहमीच वन्य प्राणी दिसत असल्यामुळे त्यांना साहजिकच भीती वाटते. मात्र, अमरावती शहरातील महादेव खोरी वडाळी राज्य राखीव पोलीस दल वसाहत तपोवन परिसर विद्यापीठ परिसर या भागात आतापर्यंत वन्य प्राण्यांनी कुठल्याही व्यक्तीवर हल्ला केला नाही त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही असे वनविभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांत घबराट घराच्या परिसरात वाघ बिबट्या दिसत असल्यामुळे महादेव कोळी आणि मंगलधाम कॉलनी परिसरातील काही जणांनी प्रचंड भीती व्यक्त केली. वनविभागाने परिसरात फिरणाऱ्या वन्य प्राण्यांची दखल घेऊन आम्हाला संरक्षण द्यावे अशी मागणी केली. तर याच परिसरातील काही व्यक्ती हा परिसर वास्तवात वन्य प्राण्यांचा परिसर असून आम्ही येथे राहायला आलो. आता बिबट्या दिसणे आमच्यासाठी काही नवीन राहिले नाही. बिबट्याने कुठल्याही व्यक्तीवर हल्ला केलेला नाही.