अमरावती - लोकसभा निवडणुकीसाठी जनजागृतीसाठी शिक्षण विभाग आणि गणेशदास राठी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काल (सोमवार) शहरात सायकल आणि मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शहरातील सुमारे १२०० शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता.
गेल्या महिन्यापासून माध्यमिक शिक्षण विभागामार्फत मतदानाची गुढी, पथनाट्य, बोलक्या बाहुल्या, हायड्रोजन बलून, मानवी साखळी, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा आदी विविध उपक्रमाद्वारे मतदानाची जनजागृती केली जात आहे. यानंतर आता शहरात सायकल व मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ७ वाजता रॅलीला सर्व शिक्षक उपस्थित होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हिरवा झेंडा दाखवत रॅलीला मार्गस्थ केले. शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या नवीन उपक्रमासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करत स्वाक्षरी फलकावर 'ग्रेट वर्क' म्हणून असे लिहिले.
रॅलीने शहरातील विद्यापीठ, साईनगर, नवसारी, दस्तूरनगर आणि नागपुरी गेट आदी प्रमुख रस्त्यांवर फेरी मारली. शिवाजी बीट, समर्थ बीट, संत कंवरराम बीट, रामकृष्णबीट आणि अमरावती ग्रामीण आदी बीटमधील सुमारे १२०० शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन नीता मुंगळा, आभार मीना शर्मा यांनी मानले. यावेळी मतदान जनजागृती करता निरज देशमुख आणि सहकार्यांनी मतदानासंदर्भात उत्कृष्ट गीत सादर केले. डोक्यात टोपी आणि गाडीवर गो वोटिंगचा लोगोने सर्व परिसर जनजागृतीच्या वातावरणाने भरलेला होता. विविध शाळांनी दुचाकी चालकांसाठी सरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रॅलीचा समारोप राठी विद्यालय येथे पसायदानने करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी नीलिमा टाके, श्री गणेशदास राठी शिक्षण संस्थेचे सचिव नंदकिशोर कलंत्री, सहसचिव डॉक्टर गोविंद लाहोटी, मुख्याध्यापक एस एस पाचंगे, सहायक नोडल अधिकारी वीरेंद्र रोडे, श्रीनाथ वानखडे, ज्ञानेश्वर टाले व मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.