अमरावती - आयुष्यभर आपल्या फळ्याने स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे बाबा यांची गाडी त्यांच्या मृत्यूनंतर बंद पडली होती. ज्या गाडीने संत गाडगे बाबा लाखो किलोमीटर फिरले आणि नंतर त्याच गाडीत संत गाडगे बाबांचा देह विसावला. ती गाडी जुनी व जीर्ण झाल्यामुळे त्या गाडीची डागडुजी करून तिला नवेरूप देण्यात आले. त्या वाहनातून गाडगे महारांजाच्या दहा कलमी संदेशाचा प्रचार व प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा निर्णय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला आहे.
गाडगेबाबाचे जुने वाहन अमरावती जिल्ह्यातील नागरवाडी येथे होते. त्या वाहनाचे आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिनी लोकार्पण करण्यात आले. या गाडीतून पुन्हा प्रचार प्रसार होणार आहे.
गाडगेबाबांच्या आठवणीला उजाळा-
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगांव येथे झाला. त्यांनी खेडोपाडी, शहरात जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार, प्रसार केला. तर त्यांनी अंधश्रद्धेवर सडकून प्रहार केला होता. गाडगेबाबा ज्या वाहनातून कीर्तन करायला जात होते. तेच वाहन आज पुन्हा सुरु करण्यात आले. नागरवाडी येथील त्यांच्या आश्रमात ही गाडी होती. धूळखात पडलेल्या या गाडीची नव्याने डागडुजी करून आज गाडगेबाबांच्या आठवणीला उजाळा देण्यात आला. आज नवीन वर्षाला मोठ्या थाटात या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.
हेही वाचा- फायजर, बायोएनटेक कंपनीच्या कोरोना लसीला WHOची परवानगी