अमरावती - शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक प्रचार सध्या जोरात सुरू असताना शिक्षण संघर्ष संघटनेच्या उमेदवार संगीता शिंदे यांनी सभा घेणाऱ्या सर्व मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी विभागीय आयुक्तालयात ठिय्या केला. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेली सभा निवडणूक कायद्याचा भंग करणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे श्रीकांत देशपांडे यांच्यासह त्यांच्या प्रचारासाठी सभा घेणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, माध्यमिक शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली. संबंधितांवर गुन्हे दाखल होईपर्यंत संगीता शिंदे यांनी विभागीय आयुक्तालयात ठिय्या देण्याचा निर्धार केलाय.
कोरोनामुळे राज्यात साथरोग नियंत्रण कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, फौजदारी प्रक्रिया संहिता 1972 चे कलम 144 लागू असल्याने निवडणूक प्रचारासाठी सभा घेण्यास परवानगी नाही. असे असताना देखील 19 नोव्हेंबरला श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारासाठी मंत्री उदय सामंत, यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली. हा प्रकार कायद्याचा भंग करणारा असल्याने उमेदवारांसह सर्व उपस्थित मंत्र्यांवर गुन्हे दाखल व्हावे, अशी तक्रार संगीता शिंदे यांनी दिली आहे.
प्रशासन करणार कारवाई
संगीता शिंदे यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करून कारवाई होणार असल्याचे आश्वासन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
गुन्हे दाखल होईपर्यंत ठिय्या
प्रशासनाच्या वतीने संगीता शिंदे यांच्या तक्रारीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मात्र, जोपर्यंत कारवाईचा कागद हातात येणार नाही, तोपर्यंत ठिय्या कायम राहणार असल्याची भूमिका शिंदे यांनी मांडली.