अमरावती - नागपूर मार्गावरील व्हाईट कॅसल बारमध्ये चोरट्यांनी वरच्या माळ्यावरील खिडकीतून प्रवेश करून गल्ल्यातील रोख रकमेसह महागडी दारुवर डल्ला मारला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
सकाळी ५ वाजता १९ ते २० वर्ष वयोगटातील २ चोरट्यांनी बारच्या मागच्या बाजूने असणाऱ्या सर्व्हिस लाईनमधून बारच्या आवारात प्रवेश केला. यानंतर एका खांबावरून वर चढून वरच्या मजल्यावरील खिडकीतून दोघेही बारच्या आत शिरले. स्वयंपाकघरातून दोघेही बारच्या गल्ल्यापर्यंत पोहोचल्यावर एकाने गल्ल्यातील रोख रक्कम काढली. त्यानंतर गल्ल्यालगत ठेवलेल्या महागड्या दारूच्या बाटल्या बॅगमध्ये भरल्या. स्वयंपाक घरात दोघांनीही एका बाटलीतील दारू पिली आणि बारमधून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हॉटेलचे मालक गुड्डू रामरख्यानी यांनी सोमवारी सकाळी बार उघडल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर गडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गडगेनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.