अमरावती - चांदुररेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर ( Chandur Railway Taluka People Migration ) येथील एका समाजाच्या नागरिकांना ग्रामपंचायतने पाणी दिले नाही, त्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून हे लोक गावाच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. या आंदोलन स्थळी रिपब्लिकन पक्षाचे खरात गटाचे अध्यक्ष ( Sachin Kharat Visit At Savangi Magrapur People Agitation ) सचिन खरात यांनी भेट देत घटनेचा निषेध केला. फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दलितांना संघर्ष करावा लागतो. हे दुर्दैव असून मान खाली घालणारी घटना आहे. त्यामुळे राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांच्या आठही मागण्या पूर्ण कराव्या व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे व तसेच या नागरिकांना सहा महिने पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी सचिन खरात यांनी केली.
काय आहे प्रकरण -
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर या गावात ग्रामपंचायतने एका वस्तीतील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी मध्यरात्रीपासून गाव सोडून गावाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणात स्थानिक भाजपचे आमदार प्रताप अडसड (BJP Mla Pratap Adsad) यांनी गंभीर दखल घेत दोषीवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या संदर्भात तक्रार आली असून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
'जिल्हाधिकारी आणि पोलिसांना चौकशीचे आदेश' -
या संदर्भात बोलताना पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur On People Migrated In Amaravati ) यांनीही प्रतिक्रिया दिली. यापूर्वीही याच भागात अशाच प्रकारे स्थानिक राजकारणातून प्रकार झाला होता. मात्र, याबाबत आता जिल्हाधिकारी आणि पोलिसांना चौकशी करण्यास सांगितले असून त्यातून सत्य काय ते समोर येईल, असे ठाकूर म्हणाल्या.