अमरावती : दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या ( Lakshmi Pujan in Diwali ) पर्वावर वर्षभराच्या हिशेबासाठी लागणारी वही अर्थात चोपडीची पूजा केली जाते. यानंतरच वर्षभराचा हिशेब व्यापारी, व्यावसायिक या चोपड्यांवर नमूद करतात. हिंदू धर्मात अतिशय मान असणारी ही चोपडी अमरावती शहरात सलग 207 वर्षांपासून शाहीन स्टेशनर्सच्या माध्यमातून मुस्लिम कुटुंब हिंदू बांधवांसाठी उपलब्ध करून देत आहे.
1814 मध्ये हिब्तुल्ला भाई बहिवाला यांनी सुरु केला व्यवसाय : अमरावती शहरात आज प्रभात प्रभात टॉकीज लगत असणारे शाहीन स्टेशनर्स या दुकानासमोर दिवाळीच्या पर्वावर अनेक व्यापाऱ्यांची गर्दी उसळते. या व्यवसायाची सुरुवात शहरातील सराफा बाजारात 1814 मध्ये हिब्तुल्ला भाई बहिवाला यांनी केली होती. त्याकाळी स्वतःच्याच घरी असणाऱ्या छापखान्यात व्यापाऱ्यांना वर्षभराच्या हिशेबासाठी लागणाऱ्या वह्या हिब्तुल्ला भाई बहिवाला हे त्यांच्या बोहरा गल्ली स्थित घरालगत असणाऱ्या छापखान्यात तयार करायचे. सराफा बाजार येथील दुकानातून अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील तसेच लगतच्या अकोला, यवतमाळ, नागपूर ,वर्धा जिल्ह्यातून देखील अनेक व्यापारी दिवाळीच्या पर्वावर हिशेबाच्या नव्या वही खरेदी करण्यासाठी हिब्तुल्ला भाई बहिवाला यांच्या शाहीन स्टेशनर्स वर यायचे. मुल्ला फक्रुद्दीन बहिवाला यांनी 1960 मध्ये त्यांचा हा व्यवसाय सराफा बाजारातून प्रभात टॉकीज लगत हलविला. यावर्षी एप्रिल महिन्यात मुल्ला फक्रुद्दीन बहिवाला यांचे निधन झाले.
बहिवाला कुटुंबाच्या सहाव्या पिढीवर व्यवसायाची धुरा : 1814 मध्ये सुरू हिब्तुल्ला भाई यांनी सुरू केलेल्या हिशेब खात्याच्या वयांच्या व्यवसायामुळे ते बहीवाला याच नावाने शहरात ओळखले जाऊ लागले. आज या बहीवाला कुटुंबाची सहावी पिढी या व्यवसायाची धुरा सांभाळीत आहे. सध्या भाई वाला कुटुंबातील पाचव्या पिढीचे ताहेर बहिवाला हा व्यवसाय सांभाळीत असून या कुटुंबाची सहावी पिढी म्हणजे ताहेर बहिवाला यांचा मुलगा अलखमर बहिवाला हा देखील आता आपल्या वडिलांसोबत आपल्या पिढीजात व्यवसायात उतरला आहे.
दिवाळीत हिंदू मित्र करतात मदत : दिवाळीच्या पर्वावर दुकानात होणारी गर्दी पाहता ताहेर बहिवाला हे प्रशासनाकडून अधिकृत परवानगी घेऊन आपले दुकान थोडेसे समोर वाढवतात. त्यांच्या दुकानात नियमित तीन ते चार कर्मचारी आहेत . मात्र दिवाळीच्या पर्वावर होणारी गर्दी पाहता त्यांचे काही हिंदू बांधव पंधरा दिवसांसाठी त्यांच्या मदतीला धावून येतात. विनोद बिंड हे बाहिवाला कुटुंबाचे मित्र गत पस्तीस वर्षांपासून दरवर्षी दिवाळीच्या पर्वावर 15 दिवसांसाठी या दुकानात कामासाठी येत आहेत. महाराष्ट्र परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेले सुरेश दोंडले हे बहिवाला कुटुंबाशी असलेल्या जुन्या संबंधातून या दुकानात काम करतात. विशेष म्हणजे दुकानाचे मालक दुकानात नसले तरी त्यांच्याकडे असणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे.
ग्राहकांचा विश्वास : ज्याप्रमाणे बहिवाला कुटुंबाने या व्यवसायाची परंपरा आता सहाव्या पिढीपर्यंत जपली आहे त्याच प्रमाणे ग्राहकांचा देखील सहा पिढ्यांचा विश्वास आणि संबंध बहिवाला यांच्याशी आहे. 1814 मध्ये हा व्यवसाय सुरू झाल्यापासून जे ग्राहक येत असत त्यापैकी अनेकांची पाचवी आणि सहावी पिढी आज देखील दिवाळीच्या पर्वावर हिशेबाची वही घेण्यासाठी भाई वाला यांच्या शाहीन स्टेशनर येथे येतात.
शुभ मुहूर्त दर्शिकांचे वाटप : बहिवाला कुटुंबाच्या वतीने दिवाळीच्या पर्वावर लक्ष्मीपूजन, कुबेर पूजन, धनतेरस पुष्प नक्षत्र या दरम्यान असणाऱ्या शुभ मुहूर्ताची माहिती व्हावी यासाठी आपल्या प्रत्येक ग्राहकांना शुभ मुहूर्त दर्शिका मोफत वितरित केली जाते. या व्यवसायाच्या माध्यमातून बहीवाला कुटुंबाने निर्माण केलेला विश्वास आणि हिंदू बांधवांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद हा जाती-धर्माचे बंधन, भेदभाव विसरून एकात्मतेचा आदर्श निर्माण करणारा आहे.