अमरावती - येत्या मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, असा नवा दावा पुन्हा एकदा भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी राणे यांच्यावर टिका करत त्यांची खिल्लीही उडवली. दरम्यान काँग्रेसच्या नेत्या तथा कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनीही नारायण राणे यांच्या सत्ता बदलाच्या दाव्यावर प्रतिक्रिया देत केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नैराश्यात गेले असल्याची टीका केली.
काय म्हणाले होते मंत्री नारायण राणे -
महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. येत्या मार्चपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला अपेक्षित बदल दिसायला लागतील. सरकार पाडणे, असो वा सरकार स्थापित करणे या सर्व गोष्टी खूप सीक्रेट असतात तरीही मी माझ्या मनातली गोष्ट ती तुमच्यासमोर मांडत आहे, असे नारायण राणे म्हणाले होते.
हे सरकार अकरा दिवसांत पडेल -
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची कुठलीही संधी सोडत नाही. राज्यातील सरकार कोसळेल असे भाकीत अनेकदा नारायण राणे यांनी व्यक्त केल आहे. काही महिन्यांपूर्वी हे सरकार अकरा दिवसात पडेल, असाही दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा नारायण राणे यांनी हा नवा दावा केला आहे.
शिवसेना-भाजपा सत्तेत येईल -
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातली महाविकास आघाडीची सत्ता मार्च महिन्यात जाणार असल्याचे विधानाला दुजोरा देत, शिवसेना आणि भाजपा या आधी एकत्र होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून लवकर शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपा सोबत येऊन राज्यात नवी सत्ता येऊ शकते आणि ते मार्च-एप्रिलमध्ये येऊ शकते, त्यामुळे नारायण राणे यांचे जे विधान आहे, ते बरोबर असू शकते, असे मत मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
Yashomati Thakur Allegations : 'सत्ता हातात घेण्यासाठी महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र'