अमरावती - राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी गणपतीनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वीच अमरावतीत डेल्टा प्लसचे रुग्णदेखील आढळले होते. त्यामुळे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट डोळ्यासमोर ठेवून यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन अमरावती जिल्हा प्रशासनाने केले होते. त्याला सर्वसामान्य नागरिक प्रतिसाद देत आहे. मात्र, जबाबदार लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी मात्र कोरोनाच्या या नियमांना अक्षरशा वेशीवर टांगले असून त्यांनी सार्वजनिक गणपतीच्या महाआरतीचा सपाटा लावला आहे.
काय कारवाई होणार याकडे लक्ष -
खासदार नवनीत राणा या सध्या शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत आहेत. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर तेथे भाविकांची गर्दीदेखील होत आहे. यापूर्वीही शिवजयंती कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी गर्दी जमवली होती. तर आता अमरावती शहरातील गणपतीच्या मंडळात खासदार नवनीत राणा यांनी महाआरती केली. या महाआरतीला मात्र हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत. सर्वसामान्य लोकांनी करोनाचे नियम तोडले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, सातत्याने कोरोनाचे नियम तोडणाऱ्या खासदार नवनीत राणा यांच्यावर काय कारवाई होणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
हेही वाता - ...पुढच्या वर्षी लवकर या! अमरावतीत गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात; महापालिका सज्ज