अमरावती - जनावरांच्या साथीच्या रोगाने पशुपालकात दहशत निर्माण केली आहे. जिल्ह्यातील मेळघाट चांदुर बाजार दर्यापूर सह अन्य तालुक्यांमध्ये सुद्धा लंपी रोगाची जनावरांना मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. या आजारावर नियंत्रण, उपाय व अतिरीक्त औषधोपचार करण्यासाठी औषध खरेदीसाठी आ. बच्चू कडू यांनी आपल्या आमदार निधीमधून २० लाख रुपयांची तरतूद केली आहे. तसे पत्र त्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्ह्यासह तालुक्यात गोवंशीय पशुधनामध्ये लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या आजारावर वेळेत लसीकरण, उपाय व उपचार झाले नाही तर मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू होऊन पशुपालकांचे नुकसान होऊ शकते.
जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत १ कोटीची तरतूद - याकरीता राज्य शासनाने जिल्हा वार्षीक योजनेमार्फत जिल्ह्याला एक कोटीची तरतूद केली आहे. ही तरतूद केवळ लसीकरण व औषधोपचारासाठीच खर्च केली जाणार आहे. पशु या आजारातून बरा झाल्यानंतर त्याला लागणाऱ्या जिवनसत्व व इतर उपचारासाठी अतिरिक्त औषधीची गरज पडणार आहे. गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणुजन्य लंपी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी औषधोपचार तथा रोग प्रादुर्भाव पश्चात उपाययोजना करण्याकरिता अतिरीक्त निधी लागणार आहे.
प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात मेडीकल बँक तयार करावी - वेळेत लंपी प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याकरता औषधोपचार तथा रोग प्रादुर्भाव पश्चात करण्याकरिता अचलपूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखन्यात मेडीकल बँक तयार करण्यात यावी. जेणेकरून लंपी या विषाणूजन्य आजारापासून पशुंचे व पशुपालकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. याकरता आ. बच्चु कडू यांनी स्थानिक विकास निधीतून अचलपूर मतदार संघाकरता २० लक्ष इतकी तरतुद केली आहे. सदर निधीचा लंपी निर्मुलन व उपचारासाठी उपयोग करण्याकरता आपल्या स्तरावरुन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना तात्काळ आदेशित करावे असे पत्र आ. कडू यांनी जि.प. सीईओ यांना दिले आहे.
लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे - शेतकरी व पशुपालक आपल्या जनावरांच्या भरवश्यावर राबराब राबून आपल्याला अन्न देतो. आज त्याच्याच पशुवर संकट उभे ठाकले असताना त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रादुर्भाव पश्चात लागणाऱ्या औषधीसाठी आम्ही पशुऔषधी कंपनीच्या एम आर सोबत संपर्क साधून मोफत औषध मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतर लोक प्रतिनिधींनीही अशा प्रकारे निधी उपलब्ध करुन दिल्यास पूर्ण राज्यातील पशुपालकांना दिलासा मिळेल.