अमरावती : अमरावती शहरात औषध व्यावसायिक उमेश कोल्हे ( Pharmacist Umesh Kolhe ) यांच्या हत्येने ( Umesh Kolhe Murdercase ) खळबळ उडाली होते. या हत्येचे कनेक्शन नुपूर शर्मा समर्थन पोस्टकडे ( Murder connection Nupur Sharma ) लागल्याने यात केंद्रातील प्रमुख तपास यंत्रणा एनआयए यात अॅक्टीव्ह मोडमध्ये ( 7 accused arrested by NIA ) आली आहे. आता पुढील तपासात उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट पशुवैद्य असणाऱ्या शेख इरफान शेख रहीम यानेच रचला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या गटात सामील असणारा डॉक्टर युसुफ खान हा उमेश कोल्हे यांच्या अंत्ययात्रेतदेखील सहभागी असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.
उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा समर्थनार्थ केली होती पोस्ट : पशूंच्या औषधांचे विक्रीचे दुकान उमेश कोल्हे हे अमरावती तहसील परिसरात चालवत होते. डॉक्टर युसुफ खान हा त्यांच्याकडून नियमित औषधे खरेदी करायचा. उमेश कोल्हे यांच्यासोबत त्याची बऱ्यापैकी ओळख झाल्यामुळे कोल्हे यांनी त्याला अनेकदा आर्थिक मदत केल्याचीही माहिती समोर आली असून, त्याच्याकडे उधारीची बरीच मोठी रक्कम थकीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असताना आपल्या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. डॉक्टर युनूफ खान याने उमेश कोल्हे यांनी शेअर केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून इतर ठिकाणी त्या शेअर केल्या होत्या.
असा रचला हत्येचा कट : यानंतर शेख इरफान शेख रशीद याने उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचला. या कटात शोएब खान, मुदलीस अहमद, आतिफ रशीद, अब्दुल तोफिक, शाहरुख पठाण आणि डॉक्टर युसुफ खान हादेखील सहभागी झाला. यानंतर उमेश कोल्हे हे आपले औषधीचे दुकान कधी उघडतात, कधी बंद करतात ते कोणत्या मार्गाने घरी जातात याची संपूर्ण माहिती शेख इरफान शेख रशीद यांनी काढली. यानंतर 21 जूनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास उमेश कोल्हे हे औषधीचे दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले.
दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी साधला डाव : उमेश कोल्हे यांच्यासोबतच दुसऱ्या दुचाकीवर त्यांचा मुलगा आणि सून हेदेखील होते. श्याम चौक परिसरातील घंटी घड्याळलगत त्यांची दुचाकी अडवून त्यांचा गळा चिरण्यात आला. उमेश कोल्हे यांच्या दुचाकीच्या मागे काही अंतरावर असणारे त्यांचा मुलगा आणि सून हे घटनास्थळी पोहोचतात त्यांना उमेश कोल्हे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. उमेश कोल्हे यांच्या मुलाने परिसरातील काही व्यक्तींच्या मदतीने लगतच्या खासगी रुग्णालयात उमेश कोल्हे यांना उपचारासाठी नेले असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कनेक्शन : नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्यांना जीवे मारण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही कनेक्शन आहे का? याचा तपास आता सुरू झाला आहे. उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल याची हत्यादेखील नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच घडली होती. यासह अमरावती शहरातील ज्या व्यक्तींनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केली. त्यांना त्वरित माफी मागावी, अशी धमकी मिळाली असल्यामुळे अनेकांनी माफीदेखील मागितली आहे. शेख इरफान शेख रहीम हा एका संघटनेचा पदाधिकारी असल्याचे समोर आले असून, त्याच्या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावरून पैसा पुरवण्यात आला आहे का, याचा तपासदेखील केला जाणार आहे.
एनआयए घेणार संपूर्ण प्रकरण हाती : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अमरावती शहरातील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास एनआयए करणार असल्याचे स्पष्ट केले असून, गत पाच दिवसांपासून अमरावती तळ ठोकून असणारे एनआयएचे अधिकारी आज हे संपूर्ण प्रकरण आपल्या हाती घेणार असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Umesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे हत्या प्रकरणांत सात आरोपींना अटक
हेही वाचा : Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात नागपुरातून आणखी एकास अटक
हेही वाचा : Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरण; मुख्य आरोपीला सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी