अमरावती - युवतींना भेडसावणार्या संकटांचा सामना करण्यासाठी अमरावती शहरातील मणीबाई गुजराती हायस्कूलच्या विद्यार्थिनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन सज्ज होत आहे. शाळेच्या वतीने निर्भय भव: हा उपक्रम गत दोन वर्षांपासून राबविला जात असून, यामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे.
आठवड्यातून तीन दिवस प्रशिक्षण
आपण सुरक्षित आहोत ही भावना आणि आत्मविश्वास विद्यार्थिनींमध्ये कायम राहावा यासाठी त्यांना जुडो कराटेच्या प्रशिक्षणासह संकट काळात कशाप्रकारे निर्णय घ्यावा यासाठी मणीबाई गुजराती शाळेत सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे आठवड्यातून तीन दिवस स्वसंरक्षणात्मक हालचालींबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. क्रीडा गणवेश आणि स्पोर्ट शूज घालून या विद्यार्थिनी सकाळी आठ ते दहा आणि दुपारी तीन ते पाच या दरम्यान शाळेच्या मैदानावर स्वसंरक्षणाचे धडे घेत आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देव 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाल्या. या उपक्रमामुळे मुलींमध्ये संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता निर्माण होत आहे. युवतीबाबत होणाऱ्या चुकीच्या घटनांबाबत युवतींनीच जागृत व्हावे आणि त्यांनी संकटाशी मुकाबला करावा यासाठी आमच्या शाळेच्या वतीने गत दोन वर्षांपासून हा महत्त्वाचा उपक्रम राबविला जात असल्याचे शाळेचे क्रीडाशिक्षक मंगेश व्यवहारे आणि स्वाती बाळापुरे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाल्या.
विद्यार्थिनींमध्ये उत्साह
हैदराबाद येथील श्रीराम चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्यातून मणीबाई गुजराती हायस्कूल येथील विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी मिळत असलेल्या धड्यांमुळे विद्यार्थिनींमध्येसुद्धा उत्साह पाहायला मिळत आहे. या प्रशिक्षणाद्वारे बचावात्मक हालचाली शिकायला मिळत असल्यामुळे आमच्यातही आता निर्भय भव : असा भाव जागृत होत असल्याची प्रतिक्रिया शाळेतील विद्यार्थिनींनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - Dada Bhuse in Amravati : 'पोकरा'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वंकष प्रयत्न करा : कृषी मंत्री दादाजी भुसे