अमरावती- परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानभरपाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटींच्या पॅकेजची आज घोषणा केली आहे. या तुटपुंज्या पॅकेजमधून शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याची टीका किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी आज केली आहे.
मागील आठवड्यात राज्यातील सांगली, सोलापूर, उस्मानाबाद व लातूर आदी जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे लाखो हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. या नुकसानीची पाहणी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी पॅकेजवर टीका केली आहे.
किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे म्हणाले, की मागील नुकसानीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० हजार कोटी रुपये केवळ शेतीच्या नुकसानीला दिले होते. सध्या, उद्धव ठाकरे यांनी पाच हजार पाचशे कोटी रुपये फक्त शेतीसाठी दिले आहेत. राज्य सरकार उर्वरित पैसे हे महावितरण, रस्ते आदींसाठी देत आहे. त्यामुळे सरकार केवळ शेतकऱ्यांची थट्टा करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. जे बांधावर ३ हजार ८०० रुपयांचे धनादेश दिले. तेच सरकार करत आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजार रुपये मदत देण्याचा शब्द पाळा. तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देऊ नका, असे बोंडे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी असे जाहीर केले १० हजार कोटींचे आर्थिक पॅकेज
- रस्ते पूल-२ हजार ६३५ कोटी रुपये
- नगर विकास- ३०० कोटी रुपये
- महावितरण ऊर्जा-२३९ कोटी रुपये
- जलसंपदा-१०२ कोटी रुपये
- ग्रामीण रस्ते पाणीपुरवठा-१ हजार कोटी रुपये
- शेती घरासाठी-५ हजार ५०० कोटी रुपये