अमरावती - काँग्रेस अथवा भाजपने सन्मानपूर्वक सोबत घेतल्यास त्यांच्यासोबत जाऊन निवडणूक लढवणार तसे न झाल्यास रिपाईंचा उमेदवार म्हणून तिवसा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा पत्रपरिषदेतून रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केली. काँग्रेसने आपल्या मित्र पक्षाला संपविण्याचे काम केले आहे. यशोमती ठाकूर यांना जिल्ह्यात रिपाईंला संपवायचे आहे. रिपाईंला संपविणे म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संपविणे होय. तसे झाल्यास आम्हीही इंदिरा गांधी व जवाहरलाल नेहरू यांचे काँग्रेसचे विचार जिल्ह्यातून संपवून अमरावती जिल्हा काँग्रेसमुक्त करू असा गर्भित इशारा डॉक्टर राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
राजकारणात चिरकाल कोणीच कोणाचा शत्रू नसतो - आजचे राजकारण व त्याकाळचे राजकारण वेगळे आहे. राजकारणात कुणीही कुणाचा चिरकाल शत्रू किंवा मित्र नसतो. रिपाईं भाजपसोबत गेल्यास आपली विचारधारा कदापी सोडणार नाही. काँग्रेस पक्ष हा झोपला आहे. झोपेतून जागे करुन त्यांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक आहे. या आधीसुद्धा दादासाहेब गवई यांनी सन १९८९ व १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसला त्यांची जागा दाखवून त्यांना जागे केले होते. असेही डॉ. राजेंद्र गवई यानी सांगितले.
जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मजबूत करण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पिरीपाचे जोगेंद्र कवाडे एकत्र आल्यास त्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची आपली तयारी असल्याचे यावेळी डॉ. गवई यांनी एका प्रश्नाच्या उत्तरा दाखल सांगितले.
शरद पवारांच्या शब्दामुळेच नवनीत राणांना मदत - राष्ट्रवादीचे सुप्रीम शरद पवार यांच्या आग्रहास्तव नवनीत राणा यांना लोकसभेत निवडून आणले. त्याचबरोबर तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर या रिपाईंच्या मदतीनेच निवडून आल्या आहेत. यशोमती ठाकूर यांनी अमरावती लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार घोषित केला आहे. तेव्हा महाविकास आघाडीतील सेना-राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? काँग्रेसच्या पंजा या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवीत नसल्यामुळे यशोमती ठाकूर यांचा आपल्यावर राग असल्याचा आरोप डॉक्टर राजेंद्र गवई यांनी यावेळी केला.
काँग्रेस मागासवर्गीय आणि मुस्लिम यांचा वापर करत आहे - काँग्रेसला वाटतं की इथला मुस्लिम व मागासवर्गीय समाज भाजप सोबत जाऊ शकत नाही. त्यामुळेच दलित मुस्लिमांचा वापर काँग्रेस करीत आहेत. त्यामुळे भाजपसोबत जाणे ही रिपाईं चूक करीत आहे. असे असले तरी भाजपसोबत जाणारा रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती धर्म समभाव असणारा पक्ष आहे. कायम विचारावर चालणार असल्याचे यावेळी डॉक्टर गवई यांनी सांगितले.
निवडून येऊन आमदार व्हायचे आहे - शिंदे भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये डॉ. राजेंद्र गवई यांच्या नावाचा समावेश असल्याचा प्रचार केला जात आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातही १२ आमदारांमध्ये घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांनी ऑफर दिली होती. मात्र त्यावेळीही मी नकारली कारण मला मागच्या दारातून नव्हे तर निवडून येऊन समोरच्या दारातून सभागृहात प्रवेश करायचा असल्याचे डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले.
तर पुन्हा नवनीत राणांना समर्थन - जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांशी केलेल्या वर्तनात कुणाची चूक आहे याची माहिती घेऊन रिपाईं आपली भूमिका ठरवणार आहे. त्याकरिता रिपाईंने समिती गठीत केली आहे. समाजाच्या तळागाळापर्यंत रिपाईं हा पक्ष पोहोचलेला आहे. रिपाइंला सन्मानपूर्वक वागणूक न दिल्यास पुन्हा लोकसभेत नवनीत राणा यांना निवडून आणणार असल्याचे डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष हिंमत ढोले, माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णू कुराडे, अर्जुन खंडारे, प्रवीण डोंगरदिवे, अनिल गवई, दीपक सरदार, आतिश डोंगरे, भारत वानखडे, प्रमोद कांबळे, सतीश हरणे, प्रल्हाद खंडारे, साहेबराव भालेराव, राजू सर्वटकर, राहुल गवई, शेषनाग गजभिये, प्रभुदास इंगळे उपस्थित होते.