अमरावती - शहरात आज दुपारी मुसळधार पाऊस बरसला. गेल्या 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस कोसळला. नाल्याकाठच्या परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
गेल्या दोन दिवसंपासून शहर आणि जिल्ह्यात पावसाचे वातावरण होते. दोन दिवसांपूर्वी तिवसा, वरुड, मोर्शी या भागात मुसळधार पाऊस बरसला होता. आज सकाळी सूर्य तळपत असताना दुपारी दोननंतर आकाशात काळे ढग दाटून आले. ढगांच्या कडकडाटांसह दुपारी तीननंतर मुसळधार पाऊस कोसळला आहे.
नाल्याकाठच्या परिसरातील रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा
शहरातील वडाळी आणि छत्री हे दोन्ही तलाव आधीच भरून वाहत आहेत. आजच्या पावसामुळे या दोन्ही तलावांचे पाणी आंबनाल्यातून वाहत आहे. यंदा आंबनाल्याची सफाई झाली नसल्याने नाल्याकाठच्या परिसरात नाल्याला पूर येण्याची शक्यता आहे. या धास्तीने नागरिकांनी घरात पाणी येऊ नये, यासाठी धावपळ सुरू केली आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीनेही नाल्याकाठच्या परिसरातील रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील शेगाव नाका आणि राजापेठ परिसरात अनेक व्यापारी संकुलात पाणी शिरले आहे. येथील व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे.