अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बहिरम येथील आदिवासी अनुदानित पंचशील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना शिळी खिचडी खाल्याने विषबाधा ( Poisoning of Female Student of Tribal ) झाल्याची घटना आज रात्री घडली आहे. विद्यार्थ्यांना उपचारासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. एका विद्यार्थिनीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आले ( Student Referred to District General Hospital ) आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये उडाली खळबळ : विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचे कळताच आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकाच खळबळ उडाली आहे. आदिवासी विकास विभाग धारणीअंतर्गत आदिवासी भागातील पालक आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवतात; परंतु वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून आला आहे. विशेष म्हणजे ही विषबाधा ३३ मुलींना झाली आहे. फक्त मुलींनाच विषबाधा कशी झाली यावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जेवणाचा दर्जा असतो सुमार : पंचशील आश्रम शाळेतील शिक्षकांशी बिरसा क्रांती दल संघटनेने जिल्हा अध्यक्ष अर्जुन युवनाते, ऋषिकेश लाव्हरे, गोलू जयस्वाल, अतुल परतेकी, वैभव लोखंडे यांनी विचारपूस केली असता पाण्याने विषबाधा झालेली आहे, असे सांगण्यात आले. परंतु अमरावती येथे उपचारासाठी दाखल झालेली रोशनी कासदेकर हिच्याशी चर्चा केली असता, शिळी खिचडी खायला दिल्याचे सांगण्यात आले.
रोज मिळणारे जेवण हे निकृष्ट दर्जाचे : सोबतच रोज मिळणारे जेवण हे सुमार दर्जाचे मिळत असल्याचा आरोप अर्जुन युवनाते यांनी केला आहे. कुठेतरी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज असून, यावर कडक नियंत्रण करायला हवे, सोबतच अधीक्षक यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. या संबंधित संघटनेच्या माध्यमातून अप्पर आयुक्त शाळेच्या विरोधात तक्रार दिली जाईल, असे बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने कळवण्यात आले आहे.