अमरावती - विदर्भाची सांस्कृतिक नगरी अशी ओळख असणाऱ्या अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या नाट्यगृहाचा पडदा कोरोना ओसरल्यावर तब्बल दोन वर्षांनी शुक्रवारी सायंकाळी उघडला. यावेळी अमरावतीकर नाट्यप्रेमी आणि नाट्य कलावंतांमध्ये जल्लोष बघालया मिळाला.
नटराज पूजनाने वाजली तिसरी घंटा -
'तिसरी घंटा' या शीर्षकाखाली तब्बल दोन वर्षांनी सादर होणाऱ्या नाटकाच्या विविध प्रयोगांना प्रारंभ झाला. नटराजाच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा नाट्यकलावंत आपली कला सादर करण्यास सज्ज होत असल्याची सकारात्मक कलाकृती नाट्यगृहात सादर होताच नाट्यप्रेमी प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी सभागृहातून नटराज यांची भव्य अशी मिरवणूक काढून नटराजांना मंचावर विराजमान करण्यात आले. यावेळी नटराज यांचे पूजन करण्यात आल्यावर सभागृहात उपस्थित प्रत्येक व्यक्तीला बुंदीच्या लाडूचा प्रसाद वाटण्यात आला.
कलावंतांच्या कलेला प्रेक्षकांनी दिलेली दाद -
`शुभारंभ' या वैभव देशमुख दिग्दर्शित नाटकाद्वारे कोरोनामुळे ठप्प झालेल्या अमरावतीच्या नाट्यसृष्टीला पुन्हा एकदा शुभारंभ झाला. यासह हर्षद ससाने दिग्दर्शित 'दस्तुरखुद्द' या नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सिने अभिनेता आशुतोष राणा यांच्या 'जागो भारत के राम' या कवितेवर आधारित दीपक नांदगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाने प्रेक्षकांमध्ये नवा जोश जागृत केला. औरंगजेबाची व्यथा मांडणारी एकांकिका विराज जाखड यांनी सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. एकूणच दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कलावंतांनी सादर केलेल्या कलेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महापौर चषक नाट्य स्पर्धेची घोषणा -
नाट्यगृहाचा पडदा उघडताच पहिल्याच दिवशी महापौर चषक नाट्य स्पर्धेची घोषणा अमरावती नाट्यपरिषदेचे पदाधिकारी चंद्रकांत डोरले यांनी केली. या स्पर्धेसह नाट्य परिषदेच्या विविध स्पर्धा तसेच बालनाट्य स्पर्धाही घेतल्या जातील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा - लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून सिलेंडरची भाववाढ - यशोमती ठाकूर