अमरावती - आपली त्वचा गोरी दिसावी, यासाठी तरुणाईमध्ये स्पर्धा लागली असल्याचे चित्र समाजात बघायला मिळत आहे. गोरं होण्याच्या नादात अनेक तरुणांना कित्येक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वास्तवात बाजारात उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही क्रीममुळे किंवा साबणामुळे त्वचा गोरी होत नाही. उत्तम आहार आणि भरपूर पाणी पिणे ( Best Option For Good Skin ) आणि गरज भासल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे, हाच आपली त्वचा उत्तम राखण्याचा योग्य पर्याय आहे. आपली त्वचा गोरी दिसण्यापेक्षा टवटवीत कशी राहील, यावर तरुणाईने भर द्यावा, असे आवाहन विदर्भ त्वचारोग संघटनेच्या सहसचिव डॉ. पल्लवी मुरके ( Dr. Pallavi Murke Talk To ETV Bharat ) यांनी 'जागतिक त्वचा आरोग्य दिना'निमित्त ( World Skin Health Day ) 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले आहे.
जनजागृतीसाठी त्वचा आरोग्य दिनाचे महत्त्व - भारतीय त्वचारोग व लेप्रोलोजिस्ट संघटनेच्यावतीने दरवर्षी 6 एप्रिल हा त्वचा आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने जनसामान्यांमध्ये त्वचे संबंधित असणारे समज आणि गैरसमज दूर व्हावेत, त्वचा नेमकी कशी असावी, स्टिरॉइड क्रीमचा दुष्परिणाम, त्वचा रोगावरील उपचारांमध्ये होणाऱ्या भोंदूगिरी याबाबत जनजागृती करून त्वचेबाबत समस्या असणाऱ्यांना उच्च दर्जाचा उपचार मिळावा, हाच मुख्य उद्देश असल्याचे डॉ. पल्लवी मुरके म्हणाल्या.
फंगल इन्फेक्शनच्या समस्येत वाढ - आपल्या देशात कुष्ठरोग, कोड यासारख्या अनेक आजारांबद्दल न्यूनगंड आणि गैरसमज आहेत. मात्र, हे सर्व आजार योग्य उपचारामुळे बरे होतात. आजच्या घडीला सर्वात मोठा प्रश्न हा फंगल इन्फेक्शनचा भेडसावत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही समस्या अतिशय झपाट्याने वाढली आहे. फंगल इन्फेक्शन वाढण्यामागे अनेक कारणं असली, तरी एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्टिरॉइड मिश्रीत क्रीमचा अनियंत्रित वापर हे मुख्य कारण असल्याचे डॉ. पल्लवी मुरके म्हणाल्या. त्वचारोग तज्ञ यांच्या सल्ल्याशिवाय फंगल इन्फेक्शनवर औषधांचा वापर आपल्याकडे सर्रास केला जातो. हा प्रकार धोकादायक असल्याचेही डॉ. पल्लवी मुरके यांनी स्पष्ट केले.
'गोरे दिसण्याची स्पर्धा टाळा'- रोज येणाऱ्या नवीन जाहिराती, तसेच आपल्या वयाच्या मित्र मैत्रिणींच्या तसेच सामाजिक दबावाखाली गोरे दिसण्यासाठी आजचे तरुण विविध प्रकारची औषधे वापरतात. तसेच बाजारात सहज उपलब्ध असणारे क्रिमही वापरतात. यामुळे काही दिवसानंतर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. अशा औषधी किंवा क्रीमचे अनेक दुष्परिणाम आहेत. यामुळे चेहऱ्यांवर मोठे फोड येणे, चेहऱ्यावर अनावश्यक केस उगवणे, त्वचा पातळ होणे, त्वचा जळजळ होणे आणि काही दिवसानंतर चेहरा काळा पडणे, हे संपूर्ण दुष्परिणाम गोरे होण्यासाठी विविध आकारांची स्पर्धा केल्यामुळे भेडसावत आहे. यामुळे चुकीच्या औषधी, क्रिम, साबणाच्या नादी लागू नये. आपला चेहरा स्वच्छ पाण्याने नियमित धुणे, रोज आंघोळ करणे, भरपूर पाणी पिणे, योग्य आहार यामुळे आपली त्वचा छान दिसायला लागते. त्वचे संबंधित कुठल्याही अडचणी असेल तर योग्य अशा त्वचारोग तज्ञ यांच्याकडून योग्य उपचाराद्वारे त्वचे संबंधीच्या समस्या सोडविणे योग्य पर्याय असल्याचेही डॉ.पल्लवी मुरके यांनी सांगितले.
हेही वाचा - Mumbai HC On ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांना 15 एप्रिलपर्यंत मुदत! कामावर रुजू होण्याचे न्यायालयाचे निर्देश