अमरावती - कंटेंन्मेंट झोनमध्ये वास्तव्य असल्याचे कारण सांगून खासगी डॉक्टरांनी उपचार नाकारले आणि त्यानंतर शासकीय दवाखान्यात तातडीने योग्य उपचार न झाल्यामुळे चार महिन्याचे बाळ दगावल्याची खळबळजनक घटना अमरावती शहरात घडली आहे. समोर आलेल्या या भीषण परिस्थितीमुळे शासकीय आणि खासगी आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
काय आहे प्रकरण -
शहरातले हनुमान नगर सध्या कंटेंन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या नगरातल्या एका भागात राजेश गणोरकर व त्यांचे कुटुंब वास्तव्याला आहे. त्यांचे भाऊ अमोल गणोरकर यांचा आराध्य नामक चार महिन्याच्या मुलाची प्रकृती चांगली नसल्याने त्याला शनिवारी 16 मे रोजी दसरा मैदान येथील डॉ. राजेश शर्मा यांच्याकडे नेले होते. डॉ. शर्मा यांनी सर्वप्रथम तुम्ही कोठे राहता असा प्रश्न विचारल्यावर गणोरकर यांनी हनुमान नगर येथे राहत असल्याचे सांगताच तपासणी व उपचार न करता बाळाची कोविड तपासणी करून घ्या आणि नंतरच या, असे सांगून परत पाठवले. त्यानंतर गणोरकर यांनी बाळाला भुतेश्वर चौक येथील डॉ. सतिश अग्रवाल यांच्याकडे नेले. डॉ. अग्रवाल यांनी औषधोपचार केले व प्रकृतीत सुधारणा न झाल्यास लाईफ केअरमध्ये दाखल करण्याचे सुचवले व तसे पत्र दिले. प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे बाळाला सदर रुग्णालयात नेल्यावर तेथेही कोणत्या भागात राहता, असा प्रश्न विचारण्यात आला. हनुमाननगर सांगताच आमच्याकडे कर्मचारी नाही, असे सांगून बाळाला दाखल करून घेण्यास नकार दिला.
त्यानंतर डॉ. बारब्दे रुग्णालयामध्ये गणोरकर बाळाला घेऊन गेले. तेथे सुद्धा उपरोक्तच अनुभव आला. हतबल झालेले गणोरकर होप हॉस्पीटलमध्ये बाळाला घेऊन गेले. त्याठिकाणीसुद्धा हनुमान नगर सांगताच थातुरमातुर उत्तरे देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. अखेर गणोरकर बाळाला जिल्हा रुग्णालयात धेऊन गेले. तेथे एक तास तातडीने कोणतीच कारवाई झाली नाही. अखेर रविवारी सकाळी 5.30 वाजता बाळाचा मृत्यू झाला.
सदर बाळाची कोविड तपासणी करण्याची विनंतीसुद्धा मान्य करण्यात आली नाही. खोलापूरी गेट पोलिसांना माहिती दिल्यावरही त्यांनी अंत्यसंस्कार करून घ्या असे सांगितले. गणोरकर कुटुंब या प्रकाराने चांगलेच संतापले असून कोविडची कोणतेही लक्षणे नसताना उपचार नाकारण्यात आले आहे. तरी संबंधित सर्वांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या निवेदनावर परिसरातल्या सर्व नागरिकांनी स्वाक्षरी केल्या आहे.
चार जणांवर उपचार करण्यास नकार
कंटेन्मेंट झोन असलेल्या हनुमान नगर येथील अन्य चार व्यक्तींवरही उपचार करण्यास खासगी डॉक्टरांनी नकार दिला आहे. त्यात दामोधर मावदे व दिलीप खडेकर यांच्यावर डॉ. मुस्तफा साबीर यांनी उपचार करण्यास नकार दिला. विशेष म्हणजे हे दोनही रुग्ण नियमित त्यांच्याकडेच उपचार घेतात. तसेच मधुकर खारकर यांनासुद्धा डॉ. पाटील यांच्याकडे नेण्यात आले होते. त्यांनी डॉ. सतीश डहाके यांच्याकडे खारकर यांना पाठवले. डॉ. डहाके यांनी त्यांना हायटेक रुग्णालयामध्ये पाठवले. तेथे त्यांना नाकारण्यात आले. रेडीयन्ट हॉस्पीटल, सिटी हॉस्पीटल, अंबापेठ येथील डॉ. साबीर, पीडीएमसी रुग्णालयातही त्यांना घेण्यात आले नाही. शेवटी त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.