अमरावती - कार्तिक शुक्ल पक्षात हिंदी भाषिक नदी, तलाव असे पाण्याचे स्रोत असणाऱ्या ठिकाणी मोठ्या उत्साहात छटपूजा साजरी करतात. यावर्षी कोरोनामुळे अमरावती शहरातील छत्री तलावात ही पूजा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने अनेकांनी आपापल्या परीने शुक्रवारी छट पूजा केली. रुख्मिणी नगर परिसरातील रहिवासी दिनेश सिंह यांनी आपल्या घराच्या छतावर एका बाजूला पाणी अडवून कृत्रिम तलाव निर्माण केला. या तलावात पूजेची सर्व तयारी करण्यात आली. घरातील मंडळीसह आप्तस्वकियांना पूजेसाठी निमंत्रण देण्यात आले आणि मावळत्या सूर्याला यावेळी उपस्थित सर्वांनी पाणी अर्पण करून पूजा केली.
खरं तर कोरोनामुळे कुणीही आनंदात नसलं तरी आज छटपूजेसाठी घराच्या छतावर तलाव निर्माण केला. स्वच्छ पाण्यात उभं राहून सूर्याला नमस्कार केला पाणी दूध अर्पण केले हा सगळा प्रसंग तलावातील अस्वच्छ पाण्यात पूजा करताना येत नाही. आजची पूजा ही पवित्र आणि आनंददायी झाली याचं आम्हाला समाधान वाटतं, अशी प्रतिक्रिया दिनेश सिंह यांच्यासह या उत्सवात सहभागी सर्वांनी दिली.