अमरावती - पाणीटंचाईने अमरावती जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. मात्र मेळघाटातील एका कूपनलिकेला धो धो पाणी लागले आहे. या कूपनलिकेतून ताशी 64 लिटर पाणी येत आहे. चिखलदरा तालुक्यातील मेळघाट व्याग्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या करी या गावात हा जणू चमत्कारच घडला आहे.
मेळघाटातील करी हे गाव चिखलदरा तालुक्यात येते. मात्र हे गाव अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यापासून जवळ आहे. करी गावलगतच्या जंगलातील वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी व्याग्र प्रकल्पाने भूजल विभागामार्फत कूपनलिका तयार करण्याचा निर्णय घेतला. भूजल तज्ज्ञ डॉ. प्रवीण कथने, वरीष्ठ भू वैज्ञानिक डॉ. सुनील कडू, कनिष्ठ भूवैज्ञानिक श्रीपाद टोहरे यांच्या मार्गदर्शनात करी गावालगत 250 फूट कूपनलिका तयार करण्यात आली. कूपनलिका तयार करताच या कूपनलिकेला धो धो पाणी लागले.
या कूपनलिकेतून ताशी 64 लिटर पाणी निघत आहे. दिवसभरात या कूपनलिकेतून 16 लाख लिटर पाणी वाहत असून आज नवव्या दिवशीही या कूपनलिकेतील पाणी वाहत आहे. व्याग्र प्रकल्पाने अद्याप कूपनलिकेवर झाकण बसविले नसल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
मेळघाटात कूपनलिकेला लागलेले पाणी सर्वांसाठी आश्चर्याचा विषय ठरत आहे. वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी कूपनलिका स्थळाला प्रत्यक्ष भेट दिल्यावर वन्यजीव विभागाने तातडीने या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या कूपनलिकेमुळे वन्यप्राणी आणि नागरिकांचीही तहान भागविता येणार असल्याची माहिती तरटे यांनी यावेळी सांगितले.