अमरावती - चांदूर रेल्वे शहरात भारतीय जनता पक्षाच्या शहर सरचिटणीसाने जमावासह दोन व्यक्तींवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. शहरातील मंगलमुर्ती नगर येथे पदाधिकाऱ्याच्या बायकोचे शेजारी परिवारांसोबत भांडण झाले. त्या भांडणात या पदाधिकाऱ्याने समुहाला सोबत घेऊन, एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्ती आणि ३४ वर्षीय महिलेवर जिवघेणा हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी हरिष वऱ्हाडे याला अटक केली असुन उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
हेही वाचा... संतापजनक! प्रेमसंबंधात अडथळा, मुलीनेच केला जन्मदात्याचा खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरीश बबनराव वऱ्हाडे (४५) व फिर्यादी रत्नमाला शंकरराव अंबुलकर (३४) राहणार शिरजगाव मोझरी यांचे वडील शेषराव गुल्हाणे (७०) हे शेजारी आहेत. वऱ्हाडे यांच्या पत्नीने रत्नमाला यांच्या वडिलांबाबत अपशब्द वापरले. याबाबत रत्नमाला अंबुलकर यांनी विचारणा केली असता, रत्नामाला यांनाच मारहाण करण्यात आली.
हेही वाचा... पुणे सनबर्न घातपात प्रकरणातील फरार आरोपी पश्चिम बंगालमध्ये जेरबंद
यानंतर आरोपी हरिश वऱ्हाडे यांच्या पत्नीने यवतमाळ येथून त्यांच्या भावाला प्रमोद राऊत याला बोलावून घेतले. यावेळी त्याच्यासोबत इतरही अनेक लोक होते. या आलेल्या लोकांनी व हरीश वऱ्हाडे यांनी रत्नामाला यांचे वडील शेषराव गुल्हाणे यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण केली. तसेच रत्नमाला अंबुलकर यांना देखील मारहाण करत जखमी केले. यानंतर हरीश वऱ्हाडे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी हरीश वऱ्हाडे, त्याची पत्नी व प्रमोद राऊत (रा. यवतमाळ) यांच्यासह इतर अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात आरोपी हरीश वऱ्हाडे याला अटक केली आहे. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहे.