अमरावती - संत रविदास महाराज यांचे दिल्ली येथील सहाशे वर्ष जुने मंदिर तोडल्याच्या निषेधार्थ भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ आज (शुक्रवारी) अमरावतीत भीम आर्मीने मोदी सरकारचा निषेध नोंदविला. भीम आर्मीच्या आंदोलनामुळे शहरात राज्य राखीव पोलीस दलासह शहर पोलिसांचा कडेकोट बंदोस्त होता.
भीम आर्मीच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने राजकमल आणि इर्विन चौकात सकाळपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्यता पाहता राज्य राखीव पोलीस दलाची तुकडीही तैनात करण्यात आली होती. दरम्यान, इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टरही जाळले. या आंदोलनात भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुदाम बोरकर, शहर अध्यक्ष बंटी रामटेके, अनंत इंगळे आदी अनेक कार्यकर्ते सहभागी होते.