अमरावती - अमरावती विभागात मागीलवर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम म्हणजे मागील ५ वर्षाच्या तुलनेत यावर्षी भूजल पातळीत सर्वाधिक घट झाली आहे. ५ जिल्ह्यातील ५६ तालुक्यांपैकी ४९ तालुक्यात मागील ५ वर्षाच्या तुलनेत पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. यामुळे शेकडो गावांना भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा आणि यवतमाळ या ५ जिल्ह्यातील भुजल पातळीत मोठी घट झाली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १४ तालुके, अकोला ७, वाशिम ६, बुलडाणा १३ आणि यवतमाळमधील ९ तालुक्यात मागीलवर्षी चांगला पाऊस पडला नाही. चांगला पाऊस पडला नसल्यामूळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागातील जलसाठे हे पूर्णपणे भरले नाहीत. त्यामुळे जलसाठ्यातील पाण्याची टक्केवारी ही मोठया प्रमाणावर कमी झाली आहे. मार्च महिन्याच्या आकडेवारीत अमरावती विभागातील जलसाठ्यात केवळ २२ टक्केच पाणीसाठा असल्याचे समोर आले होते. पाणीसाठा कमी असल्याने विहरीमधील पाण्याच्या पातळीतही मोठी घट झाली आहे.
विदर्भात सध्या उन्हाचा पारा झपाट्याने वाढला आहे. ४४ अंश डिग्रीच्यावर पारा पोहचला आहे. नागरिकांना उन्हाचा फटका सहन करावा लागतो. असे असताना अमरावती विभागातील ५ जिल्ह्यातील नागरिकांना धगधगत्या उन्हाबरोबरच पाणी टंचाईचे चटके खावे लागत आहेत.