अमरावती - शहरातील अॅड. नितीन उजगावकर यांनी त्यांच्या कल्पकतेतून प्लॅस्टिक बॉटलपासून हे घर साकारले आहे. त्यांच्या या प्लॅस्टिकच्या घरात २४ तास हवा खेळती राहण्याची व्यवस्था असून घरात भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे अनोखे घर उभारण्यासाठी उजगावकर व त्यांचे सहकारी अभियंता सुनील वाघमारे यांना दोन वर्षांचा कालावधी लागला आहे.
अमरावती विद्यापीठाला लागूनच असलेल्या राजुरा या छोट्याशा गावात नितीन उजगावकर यांची जागा आहे. या अडीच हजार वर्गमीटर जागेवर त्यांनी ६५० वर्गमीटरचे घर उभारले आहे. शहरातील काही हॉटेल्स संचालकांनी त्यांना या कामी मदत केली असून 20 हजार प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा यामध्ये उपयोग करण्यात आल्याचे उजगावकर यांनी सांगितले. सामान्यपणे लोखंड, स्टील तसेच सिमेंट-विटांच्या अत्याधिक वापरामुळे मध्यमवर्गीयांना घर बांधणे खूप कठीण होते. अनेकांचे तर घराचे स्वप्न पूर्णच होत नाही. त्यामुळे प्लॅस्टिक बॉटल्स हा त्यावर चांगला पर्याय असून जुडाईकरिता केवळ सिमेंटचा उपयोग करण्यात आला आहे. या घराच्या आजूबाजूचा परिसर मुद्दाम मोकळा ठेवण्यात आला आहे. त्याठिकाणी वृक्षारोपण व पार्किंग करण्यात आले आहे. घरातच शौचखड्याचा वापर करून शौचालय तयार करण्यात आले आहे. सामान्यपणे सध्या २ बीएचके फ्लॅटची किंमत सरासरी २० ते २२ लाखांपर्यंत आहे.
मात्र या प्लॅस्टिकच्या घराची किंमत त्यापेक्षा ३० ते ३५ टक्क्यांनी कमी असल्याचे श्री. उजगावकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे घर भूकंपरोधक तसेच अग्निरोधक आहे. त्याची आर्युमर्यादा सरासरी ७० ते ७५ वर्षे असल्याचा दावाही त्यांनी केला. या घराचे कंम्पाउंडसुद्धा प्लॅस्टिकच्या बॉटल्सनी निर्मित आहे. या प्लॅस्टिकपासून निर्मित घराचे लोकार्पण राजुरा येथे होणार आहे.त्यांचे अनोखे घर बघण्याकरिता अनेक नागरीक या परिसरात येत आहे.