अमरावती - येथील महापालिकेने भाजपला 4.80 लाख रुपये देणगी दिली असल्याचा धक्कादायक दावा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस अहवालात करण्यात आला आहे. 2019-20 या काळात भाजपला 20 हजार कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असून, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून अमरावती महापालिकेने राजकीय पक्षाला देणगी का दिली असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र, अमरावतीच्या महापौरांनी हा दावा तथ्यहीन आल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
2019 मध्ये कोल्हापूरला पुराचा तडाखा बसला होता. त्यावेळी कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना अमरावती महापालिकेतील सर्व सदस्यांनी एक महिन्याचे मानधन मदत निधी म्हणून देण्यासंदर्भात 16 ऑगस्ट 2019 च्या सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तवाला सभागृहाने मंजुरी दिली होती. दरम्यान, काँग्रेस, शिवसेना, बसपा, एआएमआयएम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री मदत कोशात दिले होते. भाजपच्या 48 नगरसेवकांनी मात्र, आपले एक महिन्याचे मानधन भारतीय जनता पक्ष आपदा कोशमध्ये स्वेच्छेने देण्याबाबत महापालिका प्रशासनला ठराव करून सांगितले होते.
'महापालिकेचा निधी नाही, आमचे मानधन दिले'
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस विविध राजकीय पक्षांना देणगी स्वरूपात प्राप्त निधीचा अहवाल जाहीर करताना त्यात अमरावती महापालिकेकडून भाजपला 4.80 लाख रुपयांची देणगी मिळाल्याचे म्हणतले आहे. वास्तवात अमरावती महापालिकेने आमच्या पक्षला कोणतीही देणगी दिली नाही. भाजपच्या गरसेवकांचे एक महिन्याचे मानधन कोल्हापूर पूरग्रस्तांना थेट महापालिका प्रशासनाने भाजपच्या आपदा कोषात वळती केले होते. महापालिकेकडून जी रक्कम गेली ती महापालिकेचा निधी नसून, भाजपच्या 48 नगरसेवकांच्या मानधनाची ती रक्कम होती, असे अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांनी स्पष्ट केले.