अमरावती - जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या मेळघाटमधील (Melghat) लोकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी, मेळघाटमधून रुग्णांना तत्काळ अमरावतीसारख्या शहरात उपचारासाठी आणता यावे, या उद्देशाने राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत (Health Department) अमरावती जिल्हा परिषदेच्या (Amravati Zilla Parishad) आरोग्य विभागाला पाच नव्या रुग्णवाहिका (Ambulance) दीड महिन्यांपूर्वी देण्यात आल्या. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे मागील दीड महिन्यापासून घाणीच्या साम्राज्यात या रुग्णवाहिकांचे चाकं रुतले आहेत. त्यामुळे मेळघाटमध्ये या रुग्णवाहिका पाठवण्यासाठी आरोग्य विभागाला केव्हा मुहूर्त मिळणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे. या दुर्गम भागांमध्ये वाहनांची सोय नाही, रस्ते देखील खराब आहेत. त्यामुळे येथील आदिवासींना वैद्यकीय उपचार मिळण्यास अनेकदा अडचणी निर्माण होतात. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपला जीवदेखील गमवावा लागतो .परंतु या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने मेळघाटसाठी या रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. दीड महिन्यापासून रुग्णवाहिका अमरावतीच्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या खुल्या जागेत दाखल झाल्या आहेत. त्यानंतर काही दिवसातच त्या मेळघाटला पाठवणे अपेक्षित होते. परंतु स्थानिक आरोग्य विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे मात्र या रुग्णवाहिका अशाच कचऱ्याच्या साम्राज्यात धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करून पाठवलेल्या रुग्णवाहिकांचा फायदा केंवा होणार असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
बाईक रुग्णवाहिकेचीही वाईट परिस्थिती -
मेळघाटात रस्ते खराब असल्यामुळे काही भागात मोठ्या रुग्णवाहिका जाण्यास अडचणी होतात. त्यावर मात करण्यासाठी बाईक रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या होत्या. परंतु बाईक रुग्णवाहिकांची दयनीय अवस्था आहे. चालक आणि इंधनाची व्यवस्था झाली नसल्याने त्या रुग्णवाहिका देखील धूळखात पडल्या आहेत.
युवा स्वाभिमान पार्टीचा इशारा -
दीड महिन्यापासून पडून असलेल्या रुग्णवाहिकांमुळे मेळघाटातील रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाही. शासनाने लाखो रुपये खर्च केले. परंतु, स्थानिक प्रशासनाने या रुग्णवाहिका पाठवण्याचे नियोजन करावे. लवकरात लवकर या रुग्णवाहिका मेळघाटला पाठवल्या नाही तर युवा स्वाभिमान पार्टी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देईल, असा इशाराही युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकार्यांनी दिला.
काय म्हणतात आरोग्य अधिकारी -
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांना विचारले असता ते म्हणाले की, रजिस्ट्रेशन व्हायचे आहे म्हणून या रुग्णवाहिका पाठवल्या नाहीत. लवकरात लवकर या रुग्णवाहिका पाठवू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मिशन लसीकरण अंतर्गत आलेले पंधरा वाहने होती धूळखात -
मिशन लसीकरण अंतर्गत गावोगावी लवकरात लवकर लसीकरण व्हावे या हेतूने मिशन लसीकरण अंतर्गत अमरावती जिल्ह्यासाठी 16 लसीकरण वाहने पाठवण्यात आले होते. परंतु जिल्हा आरोग्य विभागाच्या उदासीन धोरणामुळे हे वाहने देखील अनेक आठवडे या ठिकाणी धूळखात पडून होते.