अमरावती - शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मुंबई सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळा प्रकरणी सोमवारी पहाटेच ईडीने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. आमदार रवी राणा यांनी या प्रकरणी ईडीकडे चौकशीची मागणी केली होती. यामुळे शिवसेना आणि आमदार रवी राणा यांचा संघर्ष सुरू झाला आहे.
खासदार अरविंद सावंत यांनीही आमदार रवी राणा यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. यावर अरविंद सावंत यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तुमचे आहेत त्यामुळे चौकशीला मी तयार आहे. अरविंद सावंत यांनी बिनबुडाचे आरोप करू नये असा सल्लाही आमदार रवी राणा यांनी दिला आहे. शिवसेनेच्या अशा पोकळ धमक्यांना घाबरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी अडसूळांना पाठीशी घातले
उद्धव सरकारने माजी खासदार अडसूळ यांना घोटाळ्यात पाठीशी घातले आहे. म्हणूनच हे प्रकरण गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ईडी कडे गेले, त्यानंतर कारवाई सुरू झाली. सिटी सहकारी बँकेत एकूण ९ हजारांहून अधिक मराठी माणसाची बँक खाती होती. एकट्या मुंबईत एकूण १४ शाखा होत्या. पण प्रथम खातेदाराने EOW मध्ये मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही.
900 कोटींपेक्षा जास्त घोटाळा
राज्यात शिवसेना सत्तेत असून, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. म्हणून सरकारने आनंदराव अडसूळ यांना संरक्षण दिले. पुन्हा खातेदारानी आणि मी स्वतः ईडीकडे तक्रार केली. ईडीमध्ये तक्रारीनंतर त्यांनी प्राथमिक तपास केला. तेथे एकूण ९०० कोटींपेक्षा जास्त घोटाळा आहे हे निदर्शनास आले. या प्रकरणात वडील, मुलगा आणि नातेवाईक सर्व दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजप आमदार रवी राणा यांनी केली आहे.
हेही वाचा - Audio Clip Viral : आरोग्य सेवा भरतीत घोटाळा.. पदासाठी 15 लाखांपर्यंत बोली, ओबीसी नेत्याचा आरोप