अमरावती - कोरोनाने थैमान घातले असताना 22 फेब्रुवारीपासून अमरावतीत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आज लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. बाजारातील सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपरी 4 वाजेपर्यंत उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मागील दहा-बारा दिवसांपासून शांत असणाऱ्या अमरावती शहरात काहीशी गर्दी झाली आहे. कामानिमित्त अमरावतीकर घराबाहेर पडत आहेत. मात्र, तरी कोरोनाची भीती कायम आल्याचे जाणवत होते.
कोरोनाची तीव्रता कायम
काही राजकीय मंडळी आणि व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध केल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून शहर संपूर्ण खुले करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी अमरावती शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची धास्ती कायम आहे. शहरातील शासकीय कोविड रुग्णालयासह सर्व खासगी रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. गृह विलगीकरणातही अनेक रुग्ण आहेत.
28 जानेवारीपासून वाढला कोरोना
गत वर्षी मार्च महिन्यात पहिल्यांदा अमरावतीत कोरोना रुग्ण आढळून आल्यावर पुढे सलग 6 महिने कोरोना रुग्ण शहरात वाढले होते. ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असताना, या वर्षी 28 जानेवारीला एकाच दिवशी 78 कोरोना रुग्ण आढळून आलेत. त्यानंतर 29 जानेवारीला 93, 30 जानेवारीला 149, 31 जानेवारीला 128, 1 फेब्रुवारीला 92, 2 फेब्रुवारीला 118 रुग्ण, 6 फेब्रुवारीला 233, 11 फेब्रुवारीला 315, 16 फेब्रुवारीला 485, 17 फेब्रुवारीला 498, 18 फेब्रुवारीला 597, 18 फेब्रुवारीला 598, 20 फेब्रुवारीला 727 आणि 23 फेब्रुवारीला 926 रुग्ण आढळून आले. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे संकट उभे ठाकल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाला आळा घालण्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित केला.
552 जण दगावले
कोरोनामुळे जिल्ह्यात 552 जण दगावले आहेत. नव्याने लॉकडाऊन घोषित झाल्यावर 30 वर्षाच्या युवकापासून 92 वर्षापर्यंतचे वृद्धही दगावले आहेत. 60 ते 75 वर्ष वयाचे सर्वाधिक वृद्ध कोरोनाच्या नव्या लाटेत दगावत आहेत.
काही राजकीय नेत्यांचा लॉकडाऊनला विरोध
लॉकडाऊन घोषित केल्यामुळे अमरावती शहर आणि जिल्ह्यावर ओढवलेले कोरोनाचे संकट काहीसे कमी झाले. असे असताना केवळ आम्हाला विश्वासात न घेता लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले काही नेते लॉकडाऊन विरोधात भूमिका मांडत आहेत. अशा काही नेत्यांनी व्यापारी संघटनांना हाताशी धरून लॉकडाऊन नको यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून संपूर्ण शहर सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - राज्यात कुपोषण पुन्हा डोकं वर काढतंय.. एकाच महिन्यात 997 बालकांचा मृत्यू
हेही वाचा - राज्यात पेट्रोल वाहनांची विक्री 30 टक्क्यांनी घसरली; सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांना पसंती