अमरावती: भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त अमरावती अकोला या राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच बिटूमिनस काँक्रीटच्या सर्वात लांब रस्त्याची अखंडपणे निर्मितीचा विश्वविक्रम नोंदविला जाणार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून या विश्वविक्रमी कामाला सुरुवात झाली ( Amravati-Akola NH Road Construction world Record ) आहे. हे काम सलग 110 तासात 75 किलोमीटरपर्यंत लोणी ते माना या गावापर्यंत हा विक्रम नोंदविला ( 75 km road record in 110 hours ) जाणार आहे.
दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा रस्ता होता खराब -
अमरावती ते अकोला हा महामार्ग ( Amravati-Akola NH Road ) मागील दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून अतिशय खराब होता. या मार्गाचे काम यापूर्वी तीन कंपन्यांना देण्यात आले होते, मात्र हे काम सतत रखडल्यामुळे या मार्गाऐवजी अमरावती ते अकोला प्रवास नागरिक दोन वर्षांपासून दर्यापूर मार्गे बनलेल्या उत्कृष्ट रस्त्यावरून करत होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या अमरावती अकोला मार्गावरून एसटी बससह अनेक ट्रक व खासगी गाड्या धावत होत्या. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरुन तारेवरची कसरत होती. महाराष्ट्रातील अतिशय खराब रस्ता म्हणून ओळख असणारा अमरावती अकोला हा मार्ग आता विक्रमी नोंद करून उत्कृष्ट होतो आहे.
चार टप्प्यात होतेय महामार्गाचे काम-
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 ( National Highway No. 53 ) वर अमरावती ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली दरम्यान एकूण चार टप्प्यात काम सुरु झाले आहे. त्यापैकी अमरावती ते अकोला दरम्यान कामाची गती अतिशय मंदावली असल्याने, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी ( Union Minister Nitin Gadkari angry ) व्यक्त केली होती. हा मार्ग दहा वर्षांपासून रखडला आहे. यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विक्रमी वेगात या मार्गाच्या चारही टप्प्याचे काम हाती घेतले आहे.
अशी आहे तयारी -
या विश्वविक्रमी प्रयत्नाची अंमलबजावणी करण्यासाठी राजपूत इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सूक्ष्म नियोजन केले आहे. तसेच प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक महामार्ग अभियंता, क्वालिटी इंजिनियर सर्वेअर, सेफ्टी इंजिनियर यांच्यासह एकूण आठशे कर्मचारी या कामासाठी झटत आहेत. या महामार्गावर माना कॅम्प येथे व्यवस्थापन थिंक टँक वार रूम उभारण्यात आली आहे. ज्यामध्ये 4 हॉट मिक्सर, 4 बिल्डर, 1 मोबाईल फिडर, एडेमा रोलर, 166 हायवा आणि 2 न्यूमॅटिक टायर आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता निर्मीतीचा विक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याचे राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी सांगितले.
यापूर्वी कतारमध्ये नोंदविला गेला विश्वविक्रम -
सर्वाधिक वेगाने 22 किलोमीटरचा मार्ग तयार करण्याचा विक्रम कतार देशात नोंदविला गेला ( Qatar 22 km road construction world record ) आहे. अमरावती अकोला मार्गावर सुरू असलेले काम हे कतार येथील विश्वविक्रमाला मागे टाकणार आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी सुद्धा अमरावतीत दाखल झाले आहे. 7 जून रोजी सायंकाळी सात वाजता हा विक्रम पूर्ण होईल, तेव्हा लंडन येथून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम ( Guinness Book of World Records team ) या मार्गावर पोहोचणार असल्याची, माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक व्यवस्थापक राजू अग्रवाल यांनी दिली.
हेही वाचा - Reservation Announced : आरक्षण जाहीर; महापौरांसह प्रस्थापितांवर पर्यायी प्रभाग निवडण्याची वेळ