अमरावती - केसांमुळे महिलांचे सौंदर्य अधिक खुलते. किंबहुना केसांमुळेच महिलांच्या सौंदर्यात अधिक भर पडते. एखाद्या महिलांच्या डोक्यावर केस नसले तर त्या महिलांना विविध दुशन समाजाकडून दिली जातात. असे असलेत तरी सुंदर केस कोणा व्यक्तीसाठी दान करावे वाटतील अशी माणसं फार कमी पाहायला मिळतात. अमरावती येथील एका तरुणीने हे करून दाखवले आणि समाजाला एक वेगळाच आदर्श घालून दिला. २४ वर्षीय तरुणीने आपले लांब केस मुंबई येथील कॅन्सरग्रस्त महिलांकरिता काम करणाऱ्या संस्थेला विग तयार करण्यासाठी दान दिले आहेत. वृषाली किसन गजभिये, असे या तरुणीचे नाव आहे. ती संजय गांधी नगर नंबर १ येथे राहते. तिच्या भावाकडून तीला समजले की, कॅन्सरग्रस्त महिलांनासाठी 'केप विथ कॅन्सर' ही संस्था महिलांच्या आत्मविश्वास आणि सन्मानार्थ मोफत विग पुरवठा करते. तेंव्हा तिने क्षणाचाही विलंब न लावता संस्थेशी संपर्क साधून केसदान केले.
'समाजाला जे देता येते ते द्यावे' : मला सामाजिक कार्याची खूप आवड आहे. तळागाळा तल्या शोषितांकरिता काम करण्याची खूप इच्छा आहे. आर्थिक मदत कराविशी वाटते. पंरतु माझी आर्थिक स्थिती जेमतेम आहे. जे शक्य आहे ते करण्याचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे माझ्या परीने जे देता येईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते, असे वृषालीने बोलून दाखवले. माझे मोठे बंधू रोशन यांच्या मार्गदर्शनामुळेच मी केसदान करु शकली. वृषालीने केसदान केल्यामुळे तिचे समाजाच्या सर्व स्थरातून स्वागत होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून कौतुकाची थाप पडत आहे. संस्थेला केसदान करून समाजापुढे तिने एक वेगळा आदर्श ठेवला असल्याचे मत काही जाणकार नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
'केप विथ कॅन्सर' संस्था काय काम करते? : कॅन्सरग्रस्त महिला रुग्णांचे केमोथेरपी दरम्यान केस गळतात. टाटा हॉस्पिटल मुंबई, सिएमसी वेल्लोर, ऍक्टरेक खारघर, तसेच कॅन्सर हॉस्पिटल्स बैतूल, युपी, दिमापुर आणि तसेच भारतात अन्य कोणत्याही ठिकाणी ज्या कॅन्सरग्रस्त महिला रुग्ण केमोथेरपी घेत असतील तर, अशा रुग्णांना महिन्याला किमान ६० केसांचे विग दान करण्याचे काम 'केप विथ कॅन्सर' ही स्वयंसेवी संस्था 2014 सालापासून करत आहे. मदत चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा ही संस्था चालविल्या जाते. रुग्णांना मानसिक आधारासोबत सकारात्मक विचार पोहोचवण्याचे काम सुद्धा ही संस्था करते. आजपर्यंत या संस्थेकडे २५००० मुली, महिला आणि पुरुष यांनी केसांचा विग बनवण्यासाठी आपले केस दान केले आहेत.