अमरावती - अमरावती शहरातील दसरा मैदान परिसरात राधा कृष्णा अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 401 येथून पोलिसांनी 10 हजार 238.900 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख पाच लाख 39 हजार आठशे रुपये जप्त केले आहे. शनिवारी रात्री 9 वाजल्यापासून रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली.
हेही वाचा - Ravi Rana Bail Granted : मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याचे प्रकरण, आमदार राणा यांना जामीन मंजूर
दोघा जणांना पोलिसांनी केली अटक
दसरा मैदान परिसरातील राधाकृष्ण अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 401 मध्ये राजापेठ पोलीस गेले. त्या ठिकाणी आढळलेल्या दागिन्यांबाबत फ्लॅटवर हजर असणाऱ्या तीन व्यक्तींपैकी एकालाही योग्य माहिती सांगता आली नाही. पोलिसांनी या प्रकरणात राजस्थानमधील सेवाली गाव येथील रहिवासी असणारा राजेंद्र सिंग भवसिंग राव (वय 38), राजस्थानमधील उदयपूर येथील रहिवासी असणारा गिरीराज सोनी आणि राजस्थानमधील गंगापूर येथील रहिवासी असणारा अशोक खंडेलवाल या तिघा जणांची कसून चौकशी केली. पोलिसांनी राजेंद्रसिंह आण गिरीराज सोनी याला अटक केली असून, अशोक खंडेलवाल याची प्रकृती खराब झाल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
अमरावतीत सराफा व्यावसायिकांशी व्यवहार
गत चार वर्षांपासून राजेंद्र सिंग राव अमरावतीत रहात असून मुंबई येथून कुठल्याही चिट्ठी किंवा पावती शिवाय अमरावतीत दागिने आणून ते शहरातील मोजक्या काही सराफा व्यावसायिकांना विकत असावा, असा अंदाज राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी व्यक्त केला.
आयकर विभाग करणार चौकशी
शनिवारी रात्री दहा किलो सोने जप्त केल्यावर या बाबत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी म्हटले. सोमवारी आयकर विभागाचे अधिकारी याप्रकरणाची चौकशी करतील, असेही मनीष ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - OBC Reservation : 'पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापित नेत्यांमुळे ओबीसींना आरक्षण नाही', अनिल बोंडेंचा आरोप