अकोला - रामनवमीनिमित्त दारूविक्री बंद असतानाही राष्ट्रीय महामार्गावरील महाकाली बारमध्ये विदेशी दारू विक्री होत होती. परिविक्षाधीन अधिकारी निलेश देशमुख यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ३० जणांना ताब्यात घेतले आहे. बारमधील मद्यसाठा आणि रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, हा बार नेहमीच रात्रंदिवस सुरू असतो.
रामनवमीनिमित्ताने मद्यविक्री शासनाने बंद केली आहे. त्यामुळे ड्रायडे असतानाही राष्ट्रीय महामार्गावरील महाकाली बारवर सकाळपासून मद्यविक्री सुरू होती. परिविक्षाधीन पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या पथकाला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या बारवर छापा टाकला. बारमध्ये बसलेल्या ३० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बारमध्ये विदेशी दारूचा साठा मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. ताब्यात घेतलेल्या सर्वांना खदान पोलीस ठाण्याला देण्यात आली असून त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मद्याचा किती साठा पकडला, यासंदर्भात अद्याप कुठलीच माहिती मिळू शकलेली नाही. रात्रीपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याचे समजते.