अकोला - भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेले संकल्पपत्र हे लबाडांचे जेवण असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी पत्रकार परिषदेत केली. २०१४ मधील जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे भाजपने पूर्ण केले नसल्याने भाजपचे आश्वासन फसवेगिरी असल्याचेही ढोणे म्हणाले.
भारताच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या जाहीरनाम्यात ७५ संकल्प जाहीर केले आहेत. हे संकल्प म्हणजे खोटेपणाचा कळस असून २०१४ च्या निवडणुकीत दिलेली १२५ आश्वासने खोटी ठरली आहेत. ती पूर्ण न करताच नवीन ७५ आश्वासन दिल्याने जनतेला आश्वासने म्हणजे लबाडाचे आमंत्रण वाटत आहे. भाजपने आपल्या २०१४ च्या जमान्यात प्रतिवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. ५ वर्षात १० कोटी लोकांना रोजगार देण्याची सरकारची जबाबदारी होती. परंतु, रोजगार तर मिळालाच नाही. उलट ४ कोटी ७० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोजगारीचा दर ४५ वर्षातील सर्वाधिक मोदींच्या काळातच राहीला, असा आरोपही डॉ. सुधीर ढोणे यांनी केला.
काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३५ आणि ३७० कलम रद्द करण्याचे, राम मंदिराची उभारणी आणि समान नागरी कायदा अंमलात आणण्याचे आश्वासने यापूर्वीही दिली होती. मात्र, लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत असतानाही भाजप सरकारने त्याची पूर्तता केली नाही. परत २०१९च्या संकल्प पत्रात हीच आश्वासने आहेत. त्याच बाबींचा समावेश केल्याने भाजपचा ढोंगीपणा उघड झाला आहे. केवळ जनतेला परत एकदा खोटी आश्वासने देऊन मूर्ख बनविण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असेही ढोणे म्हणाले.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अकोल्याचे उमेदवार हिदायत पटेल, शहराध्यक्ष बबनराव चौधरी, मदन भरगड, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासह आदी उपस्थित होते.