नवी दिल्ली Narayana Murthy : इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी भारतीयांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर समाजाच्या विविध स्तरातून अनेक प्रतिक्रिया आल्या. काही जणांनी त्यांच्या या सल्ल्याचं समर्थन केलं, तर काहींनी विरोधही केला.
आठवड्यातून सहा दिवस काम करत असे : अलीकडेच, मीडियाशी बोलताना नारायण मूर्ती यांनी सांगितलं की, १९९४ पर्यंत ते आठवड्यातून ८५ ते ९० तासांपेक्षा जास्त काम करायचे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ते सकाळी ६:२० वाजता ऑफिसला जायचे आणि रात्री ८:३० वाजता ऑफिसमधून घरी परतायचे. त्यांनी सांगितलं की ते आठवड्यातून सहा दिवस काम करत असत. नारायण मूर्ती म्हणाले की, जे देश समृद्ध झाले, त्या देशातील नागरिकांनी कठोर परिश्रम केले आहेत.
मूर्ती यांनी गरिबी दूर करण्याचा मार्ग सांगितला : यावेळी बोलताना नारायण मूर्ती यांनी देशातील गरिबी दूर करण्याचा उपाय सांगितला. ते म्हणाले की, त्यांच्या पालकांनी त्यांना शिकवलंय, गरिबीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कठोर परिश्रम. त्यांच्या मते, हे तेव्हा शक्य आहे, जेव्हा प्रत्येक तासातून सर्वात जास्त उत्पादकता मिळते. नारायण मूर्ती यांनी सांगितलं की, त्यांनी त्यांच्या ४० वर्षांपेक्षा जास्तीच्या आपल्या व्यावसायिक जीवनात आठवड्यातील ७० तास काम केलंय.
आठवड्यातून ८५ ते ९० तास काम करायचे : नारायण मूर्ती म्हणाले की, १९९४ सालापर्यंत ते आठवड्यातून किमान ८५ ते ९० तास काम करायचे. हे काम काही वाया जात नाही. या आधी ऑक्टोबरमध्ये मूर्ती यांनी इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांना सांगितलं होतं की, चीन आणि जपानशी स्पर्धा करण्यासाठी भारताला कामाची उत्पादकता वाढवावी लागेल. यापूर्वी नारायण मूर्ती यांनी भारतीयांना आठवड्यातून किमान ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता.
हे वाचलंत का :