नवी दिल्ली - घाऊक बाजारपेठेतील महागाईने गेल्या आठ महिन्यातील उच्चांक गाठला आहे. ऑक्टोबरमध्ये घाऊक बाजारपेठेत १.४८ टक्के महागाईची नोंद आहे. कारखान्यातील उत्पादनांची किंमत वाढल्याने घाऊक बाजारपेठेत महागाई वाढली आहे.
सप्टेंबरमध्ये घाऊक बाजारपेठेत १.३२ टक्के महागाईची नोंद होती. तर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये घाऊक बाजारपेठेत शून्य टक्के महागाई होती. घाऊक बाजारपेठेत महागाई फेब्रुवारीत २.२६ टक्के होती. त्यानंतर आठ महिन्यांनी पहिल्यांदाच घाऊक बाजारपेठेत महागाईने उच्चांक गाठला आहे. ऑक्टोबरमध्ये घाऊक बाजारपेठेत अन्नाच्या वर्गवारीत उत्पादनांच्या किमती कमी झाल्या आहेत. तर उत्पादनांच्या किमती वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
असे राहिले महागाईचे प्रमाण-
- अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण ऑक्टोबरमध्ये ६.३७ टक्के राहिले आहे. तर सप्टेंबरमध्ये या वर्गवारीत महागाईचे प्रमाण हे ८.१७ टक्के राहिले आहे.
- भाजीपाल्याच्या किमती २५.२३ टक्के तर बटाट्याच्या किमती १०७.७० टक्के राहिल्या आहेत.
- बिगरअन्नात २.८५ टक्के आणि क्षारांच्या वर्गवारीत ९.११ टक्के महागाईचे प्रमाण राहिले आहे.
- उत्पादनाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण ऑक्टोबरमध्ये २.१२ टक्के तर सप्टेंबरमध्ये १.६१ टक्के राहिले.
- इंधन आणि वीजनिर्मितीमधील महागाईचे प्रमाण हे ऑक्टोबरमध्ये १०.९५ टक्क्यांनी कमी झाले आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ बाजारपेठेत महागाईचे प्रमाण ऑक्टोबरमध्ये ७.६१ टक्के राहिले आहे.