नवी दिल्ली- खाजगी वाहतूक कंपनी उबेर आता आवश्यक वस्तूंची घरपोच सेवा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी उबेरने बिगबास्केट बरोबर भागीदारी केली आहे. देशात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उबेरने हा निर्णय घेतल्याचे समजले आहे.
फक्त बिगबास्केटच नव्हे तर, अत्यावश्यक वस्तू व ओषधी पुरवणाऱ्या देशातील इतर कंपन्यांशी देखील आम्ही घरपोच सेवेबाबत चर्चा करत आहोत. आमच्या दुचाकी, चारचाकी आणि वाहनचालकांच्या मोठ्या जाळामुळे आम्हाला देशातील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू सुरक्षितरित्या त्यांच्या घरी पोहोचवता येईल, असे उबेरकडून सांगण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वेळेवर अत्यावश्यक सुविधा मिळतील आणि वाहनचालकांना देखील पैसे कमवण्याची संधी मिळेल. त्यासाठी आम्ही कुठलेही कमिशन घेणार नाही, असे भारतातील आणि दक्षिण आशियातील उबेरचे संचालक प्रभजित सिंह यांनी सांगितले.
त्याचबरोबर, उबेर देशातील सर्व वाहतूक आणि स्वच्छता नियमांचे पालन करेल. उबेर सोबत संयुक्तरित्या होत असेल्या या घरपोच सेवेच्या उपक्रमामुळे बिगबास्केटला बंगळुरू, हैदराबाद, चंदीगड आणि नोएडा येथील आपल्या ग्राहकांना घरपोच सुविधा पुरवता येईल, असे उबेरने सांगितले.
दरम्यान, जरी शासनाने कंपन्यांना अत्यावश्यक सुविधा पुरवण्याची परवानगी दिली असली, तरी आमच्या घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार इ-कॉमर्स कंपन्यांंकडून केली जात आहे. त्याचबरोबर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची घटती संख्या देखील कंपन्यांपुढे आव्हान उभे करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या संकटकाळात दिलासा! मासिक हप्ता भरण्याकरिता बँका देणार सवलत