मुंबई - केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केल्याने तेलदरात घट झाली होती. पण आता नियंत्रणातील तेलदर पुन्हा महागण्याची ( Edible Oil Price Hike ) शक्यता आहे. प्रामुख्याने आयात महागल्याने तेलदरात वाढ होण्याची शक्यता आहे असे आखिल भारतीय खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले आहे.
स्थिरावलेल्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता -
2021 च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मुंबईत खाद्यतेलाचा सरासरी दर १२५ ते १३५ रुपये प्रति लिटर होता. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आयातीत घसरण झाली होती. त्यामुळे मे-जूनदरम्यान सरासरी दर १७०-१८० रुपये प्रति लिटरच्या घरांत गेला. त्यानंतर आयात शुल्ककपातीमुळे सरासरी दर १५० ते १६० रुपयांवर आले होते. त्यानंतर हे दर १२५ ते १४० रुपये प्रति लिटरवर स्थिरावले आहेत. पण आता या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
१५ ते १८ टक्के खाद्यतेलाची मागणी मुंबईत -
भारतात एकूण मागणीच्या जवळपास ७५ टक्के तेल हे शुद्ध, तेलबिया किंवा कच्च्या तेलाच्या रूपात आयात केले जाते. त्यामध्ये पामतेल ५५ टक्के, सोयाबीन १५ टक्के व सूर्यफुल तेलाची ५ टक्के आयात होते. एकूण मागणीच्या सुमारे १५ ते १८ टक्के मागणी मुंबईत असते.
येत्या काळात खाद्यतेल महागण्याची चिन्हे -
याबाबत बोलताना आखिल भारतीय खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले की, 'देशभरातील एकूण खाद्यतेल मागणीत ६५ टक्के तेल पामतेल असते. हे तेल आयात करावे लागते. ६० टक्के आयात मुंबईच्या बंदरावर होते. केंद्राने आयात शुल्क कमी केले असले तरी आता आयातीत तेलाचे दरच वधारलेले आहेत. त्यामुळे येत्या काळात खाद्यतेल महागण्याची चिन्हे आहेत. ही दरवाढ टाळण्यासाठी खाद्यतेलावरील ५ टक्के जीएसटी केंद्राने रद्द करायला हवा. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.'
जीएसटीमुळेही महाग -
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व प्रकारचे धान्य जीएसटीमुक्त असताना केवळ खाद्यतेलावर जीएसटी आहे. त्यामुळेच खाद्यतेल महाग होत आहे. भारत हा खाद्यतेलाची सर्वाधिक मागणी असलेला देश आहे.
हेही वाचा - Pearl Farming in Osmanabad : दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी धरली मोत्यांच्या शेतीची कास