नवी दिल्ली - कोव्हिशिल्ड या लशीची किंमत राज्य व केंद्र सरकारला वेगवेगळी असल्यावरून वाद सुरू असताना सीरमने याविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. पहिल्या टप्प्यात देण्यात येणाऱ्या लशीची किंमत ही सरकारने दिलेल्या आगाऊ रकमेवर होती, असे सीरमने म्हटले आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) अॅस्ट्राझेनेकाची लस कोव्हिशिल्ड नावाने पुण्यात उत्पादित केली आहे. या आठवड्यात कंपनीने कोव्हिशिल्डच्या डोसची किंमत खासगी रुग्णालयांना ६०० रुपये तर राज्य सरकारला ४०० रुपये जाहीर केली आहे. तर सीरमने केंद्र सरकारला प्रति डोस १५० रुपये आकारणार आहे. यावरून पश्चिम बंगाल, केरळ, महाराष्ट्रासह विविध राज्यांनी कोरोना लशीची किमतीमधील फरकाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याबाबत सीरमने स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा-कच्चा माल द्या, सीरमच्या पूनावालांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना साकडे
काय म्हटले आहे सीरमने?
जगभरातील कोरोना लशीची किंमत ही भारतामधील लशीच्या किमतीबरोबर करणे चुकीचे असल्याचे सीरमने म्हटले आहे. सध्या, बाजारात कोरोनाला प्रतिबंधक असलेली कोव्हिशिल्ड ही सर्वाधिक परवडणाऱ्या दरातील लस आहे. लस उत्पादनासाठी ज्या देशांनी आगाऊ रक्कम दिली होती, त्यावरून किमती कमी ठेवण्यात आल्याचे सीरमने म्हटले आहे.
हेही वाचा-केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे सीरमकडून स्वागत
भारतासह विविध देशांनी प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी सुरू केलेल्या कार्यक्रमांतर्गत कोव्हिशिल्डचा पुरवठा अत्यंत कमी दरात करण्यात आला होता. परंतु, सध्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. विषाणू हा सतत म्युटंट होत असताना लोकांचा धोका वाढला आहे. अनिश्चितता असताना आम्हाला शाश्वतेची खात्री द्यायची आहे. कोरोनाविरोधात लढ्यासाठी आणि प्राण वाचविण्यासाठी उत्पादन क्षमतेसह उत्पादनात गुंतवणूक करावी लागणार असल्याचे सीरमने म्हटले आहे. तसेच कोरोनावरील अनेक वैद्यकीय उपचार आणि इतर साधनांच्या खर्चाहून कोरोना लशीची किंमत खूप कमी असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने सीरमला लस उत्पादनासाठी ३ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. तर दुसरीकडे लशीच्या उत्पादनसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाकरिता कंपनीचे सीईओ आदार पुनावाला यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना टॅग करत ट्विट केले होते. मात्र, सीरमला अद्याप लशीच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल मिळालेला नाही.