मुंबई - भारतीय शेअर बाजारात सध्या आनंदाचे वातावरण आहे. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) निर्देशांक (सेन्सेक्स) गुरुवारी पहिल्यांदाच 61 हजाराच्या वर ओपन झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी 61 हजार 88 ने सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच निर्देशांकाने 422 अंकानी उसळी घेत 61 हजार 159 वर निर्देशांक पोहोचला. हा निर्देशांक पहिल्यांदा 61 हजाराच्या पार गेल्यानं मुंबई शेअर बाजाराने नवा विक्रम केला आहे.
बुधवार देखील ठरला टॉप -
बुधवारी बीएसईचा निर्देशांक 335 अंकांची उसळी घेऊन 60 हजार 628 वर सुरू झाला होता. तो 60 हजार 836 वर बंद झाला. त्यामुळे गुरुवारी निर्देशांक 61 हजाराचा पल्ला गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानुसार आज 61 हजार 159 अंकांनी सेन्सेक्स सुरू झाला.
निफ्टी देखील जोरात -
त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चा निर्देशांक निफ्टी-50 देखील वधारला आहे. निफ्टीने 18 हजार अंकाचा टप्पा गाठला आहे. यामध्ये टाटा मोटर्सचे शेअर जवळपास 21 टक्क्यांनी वाढले. आज निफ्टी 106 अंकांनी उसळी घेत 18 हजार 097.85 वर सुरू झाला.